Sat, Dec 07, 2019 14:30होमपेज › Ahamadnagar › सिव्हिल सर्जनसह चौघे निलंबित

सिव्हिल सर्जनसह चौघे निलंबित

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:46AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयाच्या कँटीनमधून नेलेली बनावट दारू पिऊन 12 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक सोनवणे यांच्यासह इतर तीन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य खात्याने मंगळवारी रात्री उशिरा याबाबतचा आदेश जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे पाठविला आहे.

निलंबित झालेल्यांमध्ये तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे, तत्कालिन कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. पी. एस. कांबळे, तत्कालिन प्रशासन अधिकारी संजय राठोड व सध्याचे प्रशासन अधिकारी रमेश माने यांचा समावेश आहे. पांगरमल दारुकांडानंतर ‘पुढारी’ने जिल्हा शल्य चिकित्सकांनी निविदा न काढताच आरोपींना कॅन्टीन चालविण्यास देऊन आरोपींना कशा पद्धतीने सहकार्य केले, याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. याची सखोल चौकशी करून कारवाईसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर अनेक महिन्यांनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

पांगरमल विषारी दारुकांडाचा तपास करून मयत व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली दारू ही जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमधून आणल्याची कबुली आरोपी भीमराज आव्हाडे याने पोलिस कोठडीत असताना दिली होती. त्यावरून कॅन्टीनवर छापा टाकला असता, तेथे मोठ्या प्रमाणावर बनावट दारुसाठी लागणारे रसायन, मोकळ्या बाटल्या, लेबल्स, बूच असा साठा सापडला होता. 

दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या उपअधीक्षकांसह पाच व पोलिस खात्यातील तिघांना निलंबित करण्यात आले होते. आरोग्य विभागाने कारवाईसाठी केलेला विलंबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. मनसेनेचे अध्यक्ष गिरीष जाधव यांनी संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.