Sat, Dec 14, 2019 05:40होमपेज › Ahamadnagar › मढीत चार दुकाने आगीत जळून खाक

मढीत चार दुकाने आगीत जळून खाक

Published On: Sep 12 2019 1:47AM | Last Updated: Sep 12 2019 12:40AM
मढी : वार्ताहर 
श्री. क्षेत्र मढी येथील कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याला असलेल्या पूजा साहित्याच्या दुकानांना मंगळवारी मध्यरात्री  भीषण आग लागली. या आगीमुळे आजूबाजूंची चार दुकाने  भस्मसात झाली आहेत. हे अग्नितांडव तब्बल चार तास सुरू होते. आगीत सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

येथील कानिफनाथ मंदिराच्या पैठण बाजूच्या पायथ्याला वाह्यवळणावर  पूजा साहित्य विक्रीची सुमारे 50 हून अधिक दुकाने आहेत. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे अंकुश मरकड यांनी दुकान बंद केले. परंतु मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याचे पाहून समाधान मरकड यांनी गडावरील ध्वनिक्षेपकावरून त्वरित आगीची माहिती ग्रामस्थांना दिली. आगीची माहिती मिळताच मढी ग्रामस्थ आग विझविण्यासाठी धावले.पाण्याच्या कमतरतेमुळे ही आग सातत्याने धुमसत होती.कानिफनाथ देवस्थानच्या टाकीतील पाणी वापरून  सोमनाथ मरकड, अक्षय कुटे, मीराबाई कुटे, रमेश मरकड, अण्णासाहेब मरकड, सोमनाथ चव्हाण,  राजू मरकड, बबन  बोरुडे, राम पोळ, देवस्थान कर्मचारी बबन मरकड, अर्जुन मरकड, महेश मरकड  यांनी शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन बंब येईपर्यंत काहीशी आग नियंत्रणात आणली. ग्रामस्थांनी बाजूच्या दुकानातील साहित्य काढण्यास मदत केली.  दरम्यान, आगीची माहिती मिळताच वृद्धेश्‍वर साखर कारखाना  व पाथर्डी नगरपरिषदेचे अग्निशमन  बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळेत ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. 

आगीची तीव्रता एवढी होती की शेजारील दुकानांना झळ बसली. आगीत अंकुश मरकड, छगन पोळ, महेश मरकड, समाधान मरकड  यांच्या  दुकानांतील पूजेचे साहित्य जळून खाक झाले. अंकुश मरकड यांच्या नवीन बांधलेल्या दुकानाच्या इमारतीला आगीमुळे तडे गेले. आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे फौजफाट्यासह दाखल झाले. 

जीवाची पर्वा न करता विझविली आग

पाचव्या दुकानाबाहेर आग पसरली असती, तर आसपासची दुकाने व राहते घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. आगीवर नियंत्रण मिळवताना अनेक युवकांनी हात भाजले. तरीही जीवाची पर्वा न करता गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.