Thu, Apr 25, 2019 06:05होमपेज › Ahamadnagar › आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 05 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह भाजप गटनेते दत्तात्रय कावरे, काँग्रेस नगरसेवक सुभाष लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्तात्रय सप्रे, मनसेचे माजी शहराध्यक्ष गिरीष जाधव, उद्योजक सुमीत कुलकर्णी यांनी बुधवारी (दि.5) शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या द‍ृष्टीने सुरु असलेल्या तयारीत उपनेते अनिल राठोड यांनी विरोधकांना मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात निवडणुका होत असून प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रामुख्याने शिवसेना व भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु आहे. यात भाजपाने नगरसेवक मनोज दुलम यांना पक्षात सामील करुन घेत शिवसेनेला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर शिवसेनेने आता दत्तात्रय कावरे यांच्या रुपाने भाजपचा गटनेता गळाला लावत धक्क्याची परतफेड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या विरोधी पक्षनेते बोराटे यांनाही शिवबंधन बांधून पुन्हा एकदा शिवसेनेच्या गोटात सामील करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे माळीवाडा भागात शिवसेनेला बळकटी मिळणार आहे. माजी नगरसेवक दत्तात्रय सप्रे यांनीही राष्ट्रवादीची साथ सोडून राठोड यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. माजी नगरसेवक अशोक बडे यांच्या साथीला सप्रे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने बोल्हेगाव, नागापूर भागातही शिवसेनेने कडवे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुभाष लोंढे यांना गळाला लावण्याचे भाजपाचे मनसुबे शिवसेनेने हाणून पाडत लोंढे यांना पुन्हा शिवसेनेत घेतले आहे. प्रभाग 13 मधील लढतीत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने या माध्यमातून केला आहे. शहरात अस्तित्व संपुष्टात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष गिरीष जाधव, युवा उद्योजक सुमीत कुलकर्णी यांनीही शिवबंधन स्वीकारत प्रवेश केला आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खा.संजय राऊत, शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, सभागृह नेते गणेश कवडे आदींसह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, निवडणुकीतील उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडून आखाडे बांधले जात आहेत. यात विजय बोरुडे यांनाही भाजपने गळाला लावले आहे. राठोड यांचे समर्थक संजय चोपडा हेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, तीन विद्यमान नगरसेवकांना पक्षात घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपालाही धक्का दिला आहे.
दत्ता जाधव यांचा प्रवेश लांबला!

बुधवारी (दि.5) झालेल्या प्रवेश सोहळ्यात मनसेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव व त्यांचे पती दत्तात्रय जाधव यांचाही प्रवेश निश्‍चित झाला होता. प्रभाग 13 मधील उमेदवारीचा जाधव यांचा निर्णय अनिर्णीत राहिल्याने त्यांचा प्रवेशही लांबल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत जाधव यांचा प्रवेश होईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्याबरोबरच आणखी काही आजी-माजी नगरसेवकांचाही प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.