Wed, Jun 26, 2019 23:33होमपेज › Ahamadnagar › बबनराव सर्वसामान्यांचं नेतृत्त्व!

बबनराव सर्वसामान्यांचं नेतृत्त्व!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर/ पाथर्डी : प्रतिनिधी

माजी आ. स्व. माधवराव निर्‍हाळी यांच्या सारख्या स्वातंत्र्यसेनानींच्या सहवासात बबनरावांची कारकीर्द सुरू झाली. दुष्काळी भागाचे नेतृत्व सक्षमपणे करत बबनरावांनी संघर्षाची कार्यपद्धती सोडली नाही. सामान्यांशी बांधिलकी जपत जबाबदार नेत्यांच्या भूमिकेतून त्यांनी विधानसभेत लोकसभेत काम केले.  स्वतःची कार्यशैली जपली. वांबोरी चारी, ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थितीत विविध आंदोलने करत प्रश्न मार्गी लावले. उभे आयुष्य संघर्ष करत जगलेले बबनराव म्हणजे सर्वसामान्यांचं आगळंवेगळं नेतृत्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी केले.

पाथर्डीतील एम. एम. निर्‍हाळी विद्यालयात जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार स्व. माधवराव निर्‍हाळी यांच्या पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या जीवनगौरव सोहळ्याचे आयोजन  एकलव्य शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. पवारांच्या हस्ते बबनराव ढाकणे यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात पवार बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून खा. सदाशिव लोखंडे, विधानसभेचे माजी सभापती आ. दिलीप वळसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आ. उषा दराडे, दादा कळमकर, चंद्रशेखर कदम, पांडुरंग अभंग, संभाजी फाटके, राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे , हर्षदा काकडे, शिवाजी गाडे, सुशीला मोराळे, अतुल दुुगड, युवानेते हृषीकेश ढाकणे यांच्यासह नगर व बीड जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. 

पवार म्हणाले की, बबनरावांनी त्यांच्या आयुष्यातील ऐन उमेदीचा काळ तुरुंगात घालविला. मी विधानसभेत असताना बबनराव विधानसभेत सदस्य नव्हते. त्यावेळी त्यांनी पाथर्डीतील प्रश्नांसाठी विधानसभेत पत्रकं भिरकावली. त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाली. परंतु त्यांच्या या कृतीने पाथर्डीचा प्रश्न सुटला होता. त्यामुळे त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पाथर्डीकरांनी बबनरावांनाच विधानसभेत पाठविलं. कुठलंही आर्थिक, राजकीय पाठबळ नसतांना त्यांना आमदार, खासदार, मंत्री होण्याची संधी मिळाली.

एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला अशी संधी मिळते म्हणजे त्याच्याकडे नक्कीच काहीतरी खास असलं पाहिजे. वळसे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले असते, तर बरं  झालं असतं. आम्हाला येथे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारांच्या समस्या त्यांच्यापुढे मांडता आल्या असत्या.  बळीचे राज्य आणण्यासाठी पुन्हा एकदा कामाला लागावे लागेल. प्रताप ढाकणे यांचा उल्लेख करत वळसे पाटील म्हणाले की, प्रतापराव आता वेळ आली आहे. खर्‍या अर्थानं बळीचं राज्य आपल्याला आणावं लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवं.

सत्काराला उत्तर देतांना बबनराव ढाकणे म्हणाले, आयुष्यात जे पटले तेच केले. विचारात मतभेद होते. मात्र मनभेद नव्हते. पूर्वी राजकारणात येताना समाजासाठी काय केलं? हे पाहिलं जात. आता परिस्थिती बदलली आहे. आता कुठल्या जातीचा आहे? पैसे खर्च करणार का? सोबत गुंड आहेत का? हे पाहतात. असच होत राहिलं तर राजकारणाचं कस होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 

 

 

tags : Pathardi,news,Former, MLA, Madhavrao, nirhali's, statue, unveiled,in Pathardi,


  •