Wed, Jul 17, 2019 12:02होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची राष्ट्रवादीत धमक

शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची राष्ट्रवादीत धमक

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:33AMराहुरी : प्रतिनिधी 

सुशिक्षित तरुणांना वडे-भजे विकण्याचे सल्ले देणार्‍यांच्या विचारांची किव येत आहे, तर दुतोंडी शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्कारली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येक तरुणाला रोजगार देतानाच शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची धमक फक्त राष्ट्रवादीमध्येच असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राहुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे होते. 

युती सरकारच्या कारभारावर चौफेर टीका करीत पवार म्हणाले की,  विजय मल्ल्याने 9 हजार कोटी रुपयांना चुना लावल्यानंतर नीरव मोदी हा उद्योगपती 11.5 हजार कोटी बुडवत परदेशात फरार झाला. दुसरीकडे तुटपुंज्या रकमेसाठी बँका शेतकर्‍यांना तगादा लावत असून सरकार त्याबाबत काहीच बोलत नाही. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या. ‘व्यापार्‍यांना साथ तर शेतकर्‍यांना लाथ’ ही प्रथा भाजपाने देशात सुरू केली आहे. पैसे बुडविणार्‍या उद्योगपतींना पंतप्रधान मोदी सोबत घेऊन परदेशात जातात. यावरून पळून जाणार्‍या उद्योजकांना सरकारची साथ असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांचा पुळका दाखविणार्‍या शिवसेनेला आम्ही गांडूळ म्हटल्यास राग येतो. परंतु सेनेचे वागणे काही समजत नाही. कर्जमाफी नाही, कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस पिकांना भाव नसताना भाजपाचा विरोध दाखविणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने भाजपासह सेनेचा खरा चेहरा दिसून येत आहे. मुख्यमंत्री ‘फेकू’ तर पंतप्रधान ‘महाफेकू’ आहेत.  साखरेचे बाजार पडत असताना, शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव असताना शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. 

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर चौफेर फटकेबाजी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाअगोदर चॅनेलवाल्यांनी सिनेमा व मालिकेपूर्वी दाखविले जाणारे काल्पनिकतेची पट्टी दाखविल्यास वावगे ठरणार नाही.  

खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जनतेने त्यांना विश्‍वासाने सत्ता दिली. मात्र, या विश्‍वासघातकी लोकांनी हल्लाबोल करण्याची वेळ आणली आहे. आता मागील चुका करू नका.  माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, भाजपा धार्मिक भावनेला हात घालून धर्माचा आधार घेतो, यातूनच भीमा-कोरेगावसारखी पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी निश्‍चिंत होते.

वळसे यांनी कर्जमाफीची मागणी केल्याबद्दल आमच्या आमदारांना विधानसभेत निलंबित करण्यात आल्याकडे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अब्दुलगफ्फार मलिक, माजी खा. प्रसाद तनपुरे, शिवाजी सागर यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राजश्री घुले, मंजुुश्री गुंड, अनुराधा आदिक, डॉ. उषाताई तनपुरे, अविनाश आदिक,  आशुतोष काळे, चंद्रशेखर घुले, सुरेशराव वाबळे, प्राजक्त तनपुरे  आदी पदाधिकारी उपस्थित होते.