Tue, Jul 16, 2019 09:55होमपेज › Ahamadnagar › वन विभागाची जीप कर्जतमध्ये पेटविली

वन विभागाची जीप कर्जतमध्ये पेटविली

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 26 2018 1:30AMकर्जत : प्रतिनिधी

कर्जतमध्ये मराठा आरक्षण आंदोलनास बुधवारी हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी वन विभागाची जीप पेटवून दिली. कर्जतमध्ये सलग दुसर्‍या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कर्जतमध्ये काल सलग दुसर्‍या दिवशी बंद पाळण्यात आला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी काल सकाळी 10 वाजता सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आंदोलन न थांबविता सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी शहरातील सर्व शाळा व महाविद्यायालयांमध्ये जाऊन शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्व शाळा व महाविद्यालये बंद होऊन विद्यार्थी रस्त्यावरून जात होते. त्यावेळी वन विभागाची कार्यालयासमोर रस्त्यावर उभी असलेली जीप (एमएच15-सीडी0261) संतप्त आंदोलकांनी पेटविली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. जीप पेटविल्यावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

कर्जतमध्ये सुरुवातीला उपस्थित असलेले मोजकेच पोलिस आंदोलकांची मोठी संख्या पाहून शांत उभे होते. तेेवढ्यात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांची गाडी तेथे आली. आंदोलकांनी या गाडीवरही दगड फेकले. या वेळी जमावाला पांगविण्यासाठी मुंडे व पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी पाच-सहा पोलिस कर्मचार्‍यांसह आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे सर्वजण सैरावैरा धावू लागले. यानंतर काही आंदोलकांची धरपकड करून त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या वेळी इतरत्र पांगलेले आंदोलक परत एकत्र आले व जमाव पोलिस ठाण्यावर चालून गेला. या वेळी काही जणांनी दगडफेकही केली. मात्र, आंदोलकांतील काहीजणांनी पुढाकार घेत उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या चर्चा करून धरपकड केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करण्याची विनंती केली. परिस्थती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सोडून दिले. नंतर जमाव घोषणा देत परत छत्रपती चौकामध्ये आल्यावर प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्वांना घरी जाण्याच्या सूचना दिल्यावर सर्व आंदोलक निघून गेले.

कर्जतमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने काल सलग दुसर्‍या दिवशी शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला सर्व व्यापार्‍यांनी प्रतिसाद देत बंद पाळला. तालुक्यातील अनेक शाळा व महाविद्यालये काल बंदच होती. एसटी बससेवाही बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले. बाहेरगावी जणार्‍या नागरिकांना खासगी वाहतुकीची मदत घ्यावी लागली. तालुक्यातील राशीन व माहीजळगांव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला.