नगर : प्रतिनिधी
गॅस वितरकाकडून 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर येथील पथकाने वन परिक्षेत्र अधिकार्यास रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. 17) सायंकाळी कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य येथील विश्रामगृहावर ही कारवाई करण्यात आली.
शंकरराव ऋषिकेत पाटील (रा. साईश्रद्धा अपार्टमेंट, कायनेटिक चौक, नगर, मूळ रा. वालवड, ता. बार्शी, जि. सोलापूर) या अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार हे एच.पी. कंपनीचे गॅस वितरक आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी गॅस योजनेत शासनाच्या वन विभागातर्फे 75 टक्के अनुदान व लाभार्थ्यांकडून 25 टक्के रक्कम घेऊन घरगुती गॅस जोडणी दिली जाते. वितरकाने चालू वर्षी अखोनी, बारडगाव सुद्रिक, भांबोरा, आळसुंदे या गावांत 233 लाभधारकांना जोडण्यात दिल्या आहेत. त्याच्या बिलाचा धनादेश वितरकाला देण्यात आला होता. अदा केलेल्या रकमेतून वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांनी कमिशनपोटी 233 लाभार्थ्यांची दरडोईल 350 रुपयांप्रमाणे 233 81 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 70 हजार रुपयांची लाच घेण्याचे ठरले.
याबाबत वितरकाने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलिस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पोलिस कर्मचारी तन्वीर शेख, सतीश जोशी, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, राधा खेमनर, चालक अशोक रक्ताटे आदींच्या पथकाने रेहेकुरी अभयारण्य येथील विश्रामगृहात पंचांसमक्ष 70 हजार स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी शंकरराव पाटील यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.