Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल

मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMशिर्डी : प्रतिनिधी

मराठा समाज हा पराक्रमी समाज आहे. मराठा समाजाने समाजाच्या उन्नतीसाठी तसेच सर्व अठरापगड जातींच्या रक्षणासाठी पराक्रम उपयोगात आणला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने भूमिका स्पष्ट केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिर्डीत केले.                     

ना. मुनगंटीवार यांनी काल माध्यान्ह आरतीला हजेरी लावून साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे, भाजपचे गजाजन शेर्वेकर, किरण बोर्‍हाडे, स्वानंद रासने, आकाश तिवारी, साईराज कोते, योगेश गोंदकर, प्रसाद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्याबद्दल आक्षेप नसून हिंसेच्या मार्गाने अवलंब न करता शांततामय मार्गाने आंदोलन करावे. मराठा समाजाची ताकद अख्ख्या महाराष्ट्राने बघितली आहे. 

मराठा समाजास न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहे. आरक्षणाची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करून भाजप सरकार मराठा समाजातील गरिबातील गरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यात कर्जमाफी, दूध दरवाढ, मराठा आरक्षण यासाठी सरकार विरोधात रान पेटविले असताना जळगाव आणि सांगली महापालिकेचा निकाल ही विरोधकांना चपराक आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सत्ता हे जनतेचे इच्छा आकांशा पूर्ण करण्याचे साधन आहे. सत्ता हे कधी साध्य राहिले नाही. राज्यात आमच्या पक्षाच्या सरकारने गेली साडेतीन पावणेचार वर्ष जनतेच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात 47 वर्ष दोन महिने एक दिवस काँग्रेसचे सरकार होते. मागील पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे आघाडी सरकार होते. पंधरा वर्षामध्ये जे प्रश्‍न सुटले नाही ते प्रश्‍न या सरकारच्या माध्यमातून सुटावे ही त्यांची ठाम इच्छा आहे, याचा अर्थ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्वतःवर कमी आणि सरकारवर जास्त विश्वास आहे. 

शिवसेनेबरोबर युती असावी तसेच 25 वर्षाची आमची मैत्री कायम राहावी, अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे. युती तोडण्यासाठी भाजपचे नाव पुढे येणार नाही तर युती जोडण्यासाठी आमच्या पक्षाचे नाव पुढे येईल. शेवटी निर्णय शिवसेनेचा आहे असेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत असल्याची जोरदार चर्चा होत असल्याच्या वक्तव्यावर  स्मितहास्य करीत ते म्हणाले, असे भाष्य फक्त चार ते पाच लोक करीत असून मुख्यमंत्री बदलण्याची मागणी गैर असल्याचे त्यांनी सांगितले. 

13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राच्या जनतेचा व्हावा ही माझी आग्रही भूमिका आहे. काही लोकांनी वृक्ष लावावे आणि काहींनी हेटाळणी करावी, अशी अपेक्षा या तेरा कोटी वृक्ष लागवडीत नाही. अजूनही राज्यात 81 टक्के साक्षरता आणि 19 टक्के निरक्षरता असल्याचे सांगून जनतेने सहभाग वाढविला पाहिजे. 

झाड लावण्याच्या मिशनवर टीकाकार म्हणून भाष्य करण्याऐवजी वृक्ष लावून माझ्या कृतीतून हे मिशन पुढे नेईल, अशी सर्वांनी भूमिका ठेवली तर महाराष्ट्र देशासाठी पायोनिअर होईल.  कदाचित जगभरातून राज्याचे  वृक्ष लागवडीबद्दल कौतुक होईल, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.