होमपेज › Ahamadnagar › परदेशी पाहुण्यांचे जायकवाडीत आगमन

परदेशी पाहुण्यांचे जायकवाडीत आगमन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शेवगाव : रमेश चौधरी

जायकवाडी जलाशयात परदेशी पाहुण्यांचे आगमन होत असून, पुढील महिन्यात लाखो विदेशी पक्षांचे थवे पहावयास मिळणार आहे. खंडवा, चक्रांग, फ्लेमिंगो  अशा पक्षांचे थवे दाखल झाले आहेत. तर रोहित पक्षांचे अद्याप आगमन झालेले नाही. यंदा उंचपाय असणार्‍या पक्षांची संख्या जास्त आहे. पक्षीमित्र आलेल्या पाहुण्या पक्षांचा निरीक्षणाद्वारे आनंद घेत आहेत.

संत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पैठण नगरीत दक्षिण गंगा गोदावरीवर विस्तीर्ण असलेल्या नाथसागरात परदेशी पक्षी पाहुण्यांचे आगमन व संचार सुरु झाला आहे. उत्तर किनार्‍यालगत शेवता, ब्रम्हगव्हाण , सावखेडा, प्रवरासंगम, पिंपळवाडी, धरणाची भिंत तर दाक्षिण किनार्‍यालगत सोनेवाडी, दहीफळ, रामडोह, दहिगाव, ताजनापूर, या भागाच्या किनार्‍यापासून पक्षीमित्र डॉ. दिलीप यार्दी सह त्यांचे अनुयायी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेण्यात मग्न झाली आहेत.

पावसाळा संपल्यानंतर साधारण आक्टोबर महिन्यांपासून दरवर्षी हिवाळ्यात अंटलाटिका महासागर, सैबेरिया, नेपाळ, तिबेट, चीन, रशिया इ. देशातून ताशी 55 ते 60 किमी वेगाने हजारो किमीचा प्रवास करीत येणार्‍या  खंडवा, जंगली तितर, कोतवाल, फ्लोमिंगो, पांढर्‍या छातीची पाणकोबंडी, काळी पाणकोबंडी, चांदवी, खंड्या, कोतवाल, चमचा, ब्राम्हणी घार, पाणकावळा, गायबगळा, राखी कोतवाल, ढोकरी, छोटी टिबकली, चक्रवाक, शिक्रा,होकाट्या, टिटवी, चित्रबलक, गॉडविट, लालसरी अशा लाखो विदेशी पक्षांचे जायकवाडी जलाशयात आगमन होत आहे. मात्र, परिचयाचा रोहित पक्षाचे अद्याप आगमन झाले नाही. हे पक्षी धरणाच्या चोहोबाजू किनार्‍याला असणार्‍या पाणथळ उथळ भागात संचार करून मासे, चिंगळ्या, शेवाळ इत्यादीवर गुजराण करतात. यंदा जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याचा विस्तार वाढला गेला आहे. त्यामुळे येणार्‍या पक्षात उंच पाय असणार्‍या पक्षांची संख्या जास्त आहे.

ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत हे विदेशी पक्षी नाथसागराचा पाहूणचार घेतात. वेगवेगळ्या प्रजातीचे हे पक्षी आपल्या प्रजातीबरोबर झुंडीने धरणाच्या पाण्यात कडेने फिरतात. याच बाजूला अनेक पक्षी अंडे घालून आपल्या नवीन पिढीला जन्म देतात. पर्यावरणाचे संतुलन सांभाळण्यासाठी पक्षाची कामगिरी मोलाची असल्याने या पक्षांच्या शिकारी होत नाहीत. आलेले हे परदेशी पाहुणे पाहुणचार घेऊन मार्च महिन्यात आपल्या मूळ स्थानी परतण्यास सुरवात होते.

1976 मधे पूर्ण झालेल्या सुमारे 55 किमी लांब व 27 किमी रुंद अशा या अथांग जलाशयात एकूण 67 प्रकारचे मासे आढळतात तर सरपटणार्‍या प्राण्यामध्ये घोरपड, मगर, सरडा, कासव, साप आदी प्रकारचे प्राणी आढळतात. महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर 1986 रोजी जलाशयाचे 33 हजार 980 हेक्टर व ज्ञानेश्वर उद्यानाचे 125 हेक्टर असे एकूण 34 हजार 105 हेक्टर क्षेत्र जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.