Sat, Apr 20, 2019 08:01होमपेज › Ahamadnagar › शिक्षक परिषदेचे नागपूरला धरणे

शिक्षक परिषदेचे नागपूरला धरणे

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:46PMनगर : प्रतिनिधी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेच्या वतीने नागपूर विधीमंडळासमोर सोमवारी (दि.9) धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, अनुदान पात्र शाळा व सन 2012 च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेल्या वर्ग तुकड्यांना शंभर टक्के अनुदान मंजूर करावे, अघोषित शाळांना घोषित करून त्यांना देखील शंभर टक्के अनुदान उपलब्ध करावा, जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या प्रकरणी झालेल्या गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, 23 ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील अट क्र.4 रद्द करुन, वरिष्ठ व निवडश्रेणी सरसकट विनाअट लागू करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देवू नयेत, कॅशलेस मेडिक्लेम योजना तात्काळ लागू करावी, शालेय पोषण आहार योजना शाळेमार्फत न राबविता स्वतंत्ररित्या राबवावी, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतीबंध घोषित करावा व 24 वर्षांच्या सेवेनंतर कालबद्ध पदोन्नती लागू करावी, पदवीधर ग्रंथपाल यांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी देण्याच्या आदी 24 मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. 

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह आदिवासी विकासमंत्री, वित्तमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, पूजा चौधरी, शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.