होमपेज › Ahamadnagar › दीड वर्षापासून भाजपाला मिळेना शहराध्यक्ष!

दीड वर्षापासून भाजपाला मिळेना शहराध्यक्ष!

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:17PMनेवासा : प्रतिनिधी 

नेवासा शहर भाजपाची घडी अनेक दिवसांपासून बसत नाही. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ गेल्या दीड-दोन वर्षांपासून बसलेला नाही. सत्ता असताना देखील दीड वर्षांपासून पक्षाला शहराध्यक्ष मिळत नाही. शहराध्यक्ष निवडीसाठी यापूर्वी दोनवेळा वरिष्ठांसमावेत बैठका झाल्या. आता नुकतीच नेवासा शहराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत तिसरी बैठक झाली. तरीही शहराध्यक्षांची निवड काही होऊ शकली नाही. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. 

देशात व राज्यात सरकार असताना नेवासा शहरात भाजपाला शहराध्यक्ष मिळत नाही. याविषयी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नेवासा शहरासह तालुक्यात बर्‍याच दिवसांपासून नवा-जुना भाजपा वाद सर्वश्रृत आहे. 

नेवासा शहरात शहर भाजपा अध्यक्ष निवडीसाठी दोन दिवसांपूर्वी नेवासा फाट्यावरील वनविभागाच्या विश्रामगृहात भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, पक्ष निरीक्षक प्रसाद ढोकरीकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पाडली. यावेळी तालुक्याकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, सचिन देसर्डा, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस निरंजन डहाळे, रामभाऊ खंडाळे, सुरेशराव नळकांडे आदी उपस्थित होते. 

शहराध्यक्ष पदासाठी माजी शहराध्यक्ष संदिप आलवणे, सागर देशमुख, मुक्तार शेख, मनोज पारखे, स्वप्निल साखरे, कृष्णा परदेशी, शिवा राजगिरे, कृष्णा डहाळे आदींनी मुलाखती दिल्या आहेत. 

परंतु वरिष्ठांनी ताबडतोब शहराध्यक्षांच्या नावाची घोषणा केली नाही. हे पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त असताना निवड जाहीर होणे अपेक्षित होते. यापूर्वी दोनवेळा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांच्या उपस्थितीत देखील शहराध्यक्ष निवडीसाठी बैठका घेतल्या गेल्या आहेत. त्यावेळेसही नवा-जुना वाद होताच. दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उघड नसला तरी अंतर्गत निवडीमध्ये धूसफुस झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळेच वरिष्ठांना शहराध्यक्ष निवड जाहीर करण्यास विलंब लागला असावा. 

देशात व राज्यात सरकार असतांना शहर पातळीवर अडथळे येत असल्याने भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. दीड वर्षांपूर्वी नेवासा नगरपंचायत निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी शहराध्यक्ष पोपट जिरे उचलबांगडी केली गेली होती. तेव्हा पासून नेवासा शहराला शहराध्यक्ष नाही. 

माजी आ. तुकाराम गडाख व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे भाजपात असतानाही नेवासा शहरासह तालुक्यात भाजपामध्येच जुना-नवा वाद व नवे-जुने कार्यकर्ते आहेत. आताही बाळासाहेब मुरकुटे भाजपाचे विद्यमान आमदार असतानाही हा प्रकार चालूच असल्याने भाजप शहराध्यक्षपद दीड वर्षापासून रिक्त आहे.

भाजपा तालुकाध्यक्षपदाच्या निवडीवेळीदेखील चांगलीच चढाओढ झाली होती. नव्याने आलेल्या व निष्ठावंतामध्ये रस्सीखेच झाली होती. त्यामुळे निरीक्षकांना अखेर वरच्या पातळीवरुन तालुकाध्यक्षपदाची निवड करावी लागली होती. आता देखील भाजपा शहराध्यक्षपदाची निवडही वरिष्ठ पातळीवर होण्याची शक्यता आहे.