Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Ahamadnagar › खासदारकीसाठी इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग!

खासदारकीसाठी इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग!

Published On: Jul 31 2018 1:28AM | Last Updated: Jul 31 2018 12:22AMनेवासा : कैलास शिंदे

लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. नगर उत्तर लोकसभा मतदार संघामध्ये 2019 च्या लढतीची सर्वच पक्षांच्या पातळीवर तयारी सुरू झाली आहे. यावेळी सर्वच पक्ष स्थानिक उमेदवारांना ताकत देण्याचा प्रयत्न करतांना दिसत असल्याने यावेळी स्थानिक उमेदवारच नगर उत्तरेचा खासदार असेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभेच्या उमेदवारांच्या नावाची नेवासा तालुक्यात चर्चा होत आहे. 

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नगर उत्तर मतदारसंघात हा मतदारसंघ सेनेच्या पारड्यात गेला. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीपैकी काँग्रेसच्या वाट्यास आला आहे.  साखर कारखानदार असलेल्यांच्या नेत्यांच्या हातात या मतदारसंघाचे राजकारण आहे. अकोल्यामध्ये पिचड, संगमनेरमध्ये थोरात, कोपरगावमध्ये काळे, कोल्हे, राहाता शिर्डी, लोणीमध्ये विखे, श्रीरामपूरमध्ये भानुदास मुरकुटे, राहुरीमध्ये तनपुरे, नेवाशात घुले, गडाख अशा दिग्गजांचा हा मतदारसंघ. प्रत्येकाची तालुकानिहाय वोट बँक आहे. 2009 च्या पहिल्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे यांनी सर्व साखर कारखानदारांच्या बालेकिल्यामध्ये शिवसेनेचा भगवा रोवला. त्यांनी 5 वर्षे खासदारकीच्या माध्यमातून बरीच कामे  केली. आजही लोक त्यांच्या विकासकामांचे कौतूक करतात.

सन 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या लाटेचा अंदाज न लागलेल्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अचानक काँग्रेसमध्ये उडी घेतली. विखेंच्या बरोबर जाऊन सर्व साखर सम्राटांचे मिळून गठ्ठा मतामुळे सहज विजयी होऊ हा त्यांचा अंदाज चांगले काम असूनही मोदी लाटेने खोटा ठरवला. मोदी लाटेमध्ये सेनेने प्रथम घोलप यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीच कोर्टाच्या निकालाची चपराक घोलप यांना बसली आणि ऐनवेळेस सेनेकडून चाचपणी सुरू झाली. जामखेड मतदार संघामध्ये 2 वेळा भाजपचे आमदार असलेले सदाशिव लोखंडे यांना केवळ 8 दिवस उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली. अनेक कार्यकर्त्यांची ओळखही नसलेले सदाशिव लोखंडे मोदी लाटेमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

पण कार्यकर्ते माहिती नसलेले तसेच मतदारसंघाची देखील माहिती नसलेले, प्रचारादरम्यान अनेक गावात जाऊही न शकलेले सदाशिव लोखंडे हे निवडून आल्यानंतरही 5 वर्षात अनेक गावात पोहोचू शकले नाहीत. नेवासा तालुक्यात तर पाच वर्षात त्यांचे संपर्क कार्यालयही नव्हते. भाजपचे नेते कार्यकर्ते तर सोडाच पण शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना ते भेटू शकले नाही. पंरतु मध्यंतरी काही भागात त्यांनी  बैठका घेतल्या.  वाकचौरे यांच्या तुलनेने सदाशिव लोखंडे यांचे काम व संपर्क कोठेही दिसला नाही. त्यांना आता जोमाने काम करावे लागणार आहे.

मतदार संघाबाहेरील उपरा उमेदवार ही त्यांची प्रतिमा कार्यकर्त्यांमध्ये व जनमाणसात झाली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत सेनेलाही स्थानिक उमेदवार पाहावा लागेल अशी परिस्थिती आहे. सेना भाजपची युती न झाल्यास चौरंगी, पंचरंगी लढत होईल. अशा वेळी नगर उत्तरेमध्ये साखर कारखानदारांचा करिष्मा उमटेल असे चित्र आहे. भावी निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी यांची रूट लेव्हलला तयारी पूर्ण होत आली आहे. 1 बूथ 10 युथ ही संकल्पना राबवली जात आहे. भाजपचे उत्तर लोकसभा मतदार संघाचे प्रभारी जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर हे तालुका प्रभारी तसेच बूथ कमिट्या तयार असल्याची माहिती देतात.

भाजपाकडून नितीन दिनकर हा तरुण चेहरा पुढे येत आहे. विविध सामाजिक कार्यक्रमातून  त्यांनी आपली प्रतिमा मोठी केली आहे. प्रत्येक तालुक्यात तरुणांची मोठी फळी त्यांनी भाजपासाठी उभी केली आहे. संघाच्या मुशीतून आलेल्या या नेतृत्वाला  निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.  शिवाय  माजी खासदार वाकचौरे,  नितीन उदमले देखील  इच्छुक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही स्थानिक उमेदवारांची चाचपणी सुरू  आहे. कारखानदारांचा बालेकिल्ला असल्याने कारखान्यांकडे सर्व यंत्रणा अर्ध्या रात्री देखील तयार असते. त्यांच्याकडे देखील स्थानिक उमेदवार म्हणून अशोक गायकवाड यांचे नाव पुढे येत आह काँग्रेसचे 2 दिग्गज विखे, थोरात सारखे नेते हेदेखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी न झाल्यास स्थ्यानिक उमेदवारांनाच प्राधान्य देतील असे  बोलले जाते. आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे नाव चर्चेत आहे तर सध्या सत्तेवर असलेली सेना पुन्हा एकदा लोखंडेना उमेदवारी देणार की  उमेदवार बदलतांना बाहेरचा उमेदवार लादणार की स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणार याची कार्यकर्त्यांमध्ये मध्ये चर्चा आहे.