Sat, Apr 20, 2019 16:03होमपेज › Ahamadnagar › करंजी घाटात मोरपक्ष्यांना सकाळचा नाष्टा 

करंजी घाटात मोरपक्ष्यांना सकाळचा नाष्टा 

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:24AMकरंजी : वार्ताहर

करंजीघाट येथे मोठ्या प्रमाणात मोरपक्ष्यांचे वास्तव असून, या मोरांसाठी गेली तीन महिन्यांपासून दररोज सकाळी सहा वाजता पिण्याचे पााणी, गहू, बाजरी, तांदूळ खाण्यासाठी टाकून त्यांना एक प्रकारे सकाळचा नाष्टा देण्याचे काम करंजी गावातील हॉटेल व्यवसायिक महादेव गाडेकर करत आहे. 

यावर्षी वाढलेले तापमान आणि डोंगरमाथ्यावरील आटलेले पाणवठे, उजाड झालेली रानमाळ यामुळे जंगलासह डोंगरदर्‍यामध्ये घोटभर पाणी आणि टिचभर पोटासाठी जीव धोक्यात घालून वणवण भटकंती करतांना अनेक वन्यप्राणी पशुपक्षी ठिकठिकाणी आवर्जून आढळून येताहेत. करंजी घाटासह श्रीक्षेत्र वृद्धेश्वर परिसर, मढी, मायंबा या भागात देखील मोर पक्षासह अनेक वन्यप्राणी अशाच पद्धतीने चारा पाण्याच्या शोधात भटकंती करताना दिसतात. भटकंती करतांना अनेक वेळा या पक्षाची शिकार सुद्धा केली जाते, त्यामुळे मोरांचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे . मात्र याच पशुपक्षांना टंचाईच्या काळात सकाळी एक वेळचा नाष्टा देण्याचे काम गाडेकर तीन महिन्यापासून करत आहेत.

गाडेकर करंजी घाटामध्ये दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. त्या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की जंगलातील अनेक मोरपक्षी रस्त्याच्या कडेला येवून रस्त्याने ये-जा करणार्‍या प्रवाशांनी फेकून दिलेले खाद्यपदार्थ शोधताना दिसतात. या पक्षांना या उजाड जंगलामध्ये खाण्यासाठी काहीच नाही म्हणून दररोज सकाळी सहा वाजता गाडेकर आपल्या घरून एक किलो धान्य आणि पाच लीटर पाणी सोबत घेऊन करंजी घाटात मॉर्निंग वॉकला येतात.  गेली तीन महिन्यापासून त्यांचा हा नित्यक्रम ठरलेला आहे. 

दगडवाडी फाट्याजवळ चारा आणि पाण्याची उत्तम सोय झाल्याने दररोज पंचवीस तीस मोर, लांडोर आणि आता तर पारवे, कावळे देखील सकाळचा नाष्टा करण्यासाठी येथे हजेरी लावताहेत. जोपर्यंत भरपूर पाऊस पडून या पशुपक्षांची चारा पाण्याची सोय होत नाही, तोपर्यंत हा उपक्रम सुरूच ठेवणार असल्याचे गाडेकर यांनी सांगितले.