Tue, Jul 16, 2019 00:09होमपेज › Ahamadnagar › लोककलांना ‘महागामी’चा मिळतोय आश्रय

लोककलांना ‘महागामी’चा मिळतोय आश्रय

Published On: Jun 25 2018 1:44AM | Last Updated: Jun 24 2018 11:14PMनगर : गोरक्षनाथ बांदल

लोककलांनी प्रबोधन आणि मनोरंजनाचे प्रभावीपणे काम केले आहे. माहिती-तंत्रज्ञान युगामुळे लोककलांकडे दुुर्लक्ष होत आहे. लोप पावणार्‍या लोककलांना औरंगाबाद येथील महागामी संस्थेने आश्रय दिला आहे. नगर जिल्ह्यातील डक्कलवार, शिंगा जोशी, भोवरा, थाळी या चार लोप पावणार्‍या लोककलावंताची कला सादरीकरणासाठी निवड झाली आहे. 

डक्कलवारः तीन वाळलेले भोपळे विशिष्ठ पद्धतीने एका सरळ रेषेत बांबूवर लावले जातात. तार, दोरी आणि लाकडी खिट्ट्यांनी हे वाद्य तयार केले जाते. गायन,वादन आणि नृत्य या तीन कलांचा सुरेख संगम असणारी ही कला आहे. तिन्ही कला एकच कलाकरा एकवेळी सादर करतो, हे या कलेचे वैशिष्ट्ये आहे. खारीच्या कातड्यापासून गुडगुडी वाद्य तयार केले जाते. त्यामाध्यमातून वेगवेगळे आवाज काढले जातात. या आवाजाने लोक आकर्षित झाल्यावर कलाकार लोकगितांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतो. पौराणिक कथा सांगितल्या जातात. तसेच या वाद्यावर मोरांचा पिसांचा वापर करून नाचणारा मोर तयार केलेला असतो. या मोराच्या माध्यमातून ही नृत्यूची कला सादर केली जाते. शेवगावातील रामा व धर्मा कांबळे हे पिता-पुत्र सध्या ही कला सादर करतात.

भोवराः भोवरा कलावंत लोखंडी रिंगला नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने वेगवेगळे आकार तयार करून लोकांचे मनोरंजन करतात. दहिफळ (ता.शेवगाव) येथील नंदकुमार भोसले ही कला सादर करतात. थाळीः  दोन्ही हातांच्या तर्जनीवर दोन थाळी ठेवल्या जातात. त्यावेगवेगळ्या पद्धतीने हवेत उडविल्या जातात. त्यामाध्यमातून आपली कला सादर केली जाते. पाथर्डीतील दत्तात्रय बोरुडे ही कला सादर करण्यात माहीर आहेत.  पिंगळ्या जोशीः या कलाकरांच्या डोक्यावर वेगवेगळ्या रंगाचे फेटे असतात. गळ्यात देव-देवतांचे फोटो असतात. वेगवेगळे आवाज काढण्याचे कसब त्यांच्याकडे असते. व्यसनमुक्‍ती, ग्रामस्वच्छतेचे महत्व हे कलाकार पटवून समाजप्रबोधन करतात. 

पिंपरी चिंचवड (पुणे) येथे तिसरे अखिल भारतीय कलावंत संमेलन नुकतेच पार पडले. भाऊसाहेब भोईर स्वागताध्यक्ष होते. सुहास जोशी, सुनील महाजन हे संयोजन समिती सदस्य होते. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शेवगाव शाखाध्यक्ष उमेश घुगरीकर यांनी शेवगावातील डक्कलवार ही कला सादर करणारे कलाकार रामा व धर्मा कांबळे या पिता-पुत्रांना या संमेलनात आणले होते. प्रा.डॉ. श्रीकांत उमरीकर यांनी या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. नगर येथील लोककलेचे अभ्यासक व पत्रकार भगवान राऊत यांच्याशी संपर्क साधला. जिल्ह्यातील लोप पावणार्‍या कलावंतांची माहिती घेतली. त्यानुसार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार डक्कलवार, भोवरा, थाळी, आणि पिंगळ्या जोशी या कलावंतांना औरंगाबादमध्ये कला सादर करण्याची संधी मिळत आहे. 

लोककलावंतांना राजाश्रयाची गरज

केंद्र व राज्य शासन लोककल्याणकारी विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी मोठा खर्च केला जातो. त्यासाठी विचारदूतही निवडले जात आहेत. अभिनेत, अभिनेत्री यांचा निवड केली जाते. परंतु, त्यांच्याकडे असलेल्या कामांमुळे ग्रामीण भागात जाऊन प्रचार आणि प्रसिद्धीसाठी त्यांना फारसा वेळ मिळत नाही. लोप पावणार्‍या कलावंतांना या योजनेच्या प्रसार आणि प्रसिद्धीचे काम दिल्यास या कलांना नवीन पिढीपर्यंत जातील. त्यातून जनजागृती होऊ या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी अपेक्षा लोकसाहित्याचे अभ्यास भगवान राऊत यांनी व्यक्‍त केली आहे.