Sat, Aug 24, 2019 18:50होमपेज › Ahamadnagar › अशोक कारखान्याच्या पाच विक्रमांची नोंद

अशोक कारखान्याच्या पाच विक्रमांची नोंद

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 03 2018 11:27PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

अशोक साखर कारखान्याने माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली 65 वर्षांच्या वाटचालीतील ऊस गळीत, साखर उत्पादन, अल्कोहोल निर्मिती तसेच वीजनिर्मिती व महावितरण कंपनीला वीजविक्रीद्वारे उत्पन्नाचे आजवरचे सर्व विक्रम मोडून नवीन ऐतिहासिक पाच विक्रम 177 दिवसांत प्रस्थापित झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सोपानराव राऊत यांनी दिली.

राऊत यांनी सांगितले की, अशोक कारखान्याने यापूर्वी सन 2010-11 च्या गळीत हंगामात 6 लाख 12 हजार 107 मे. टन ऊस गाळप, 6 लाख 87 हजार 130 साखर पोत्यांची निर्मितीचा उच्चांक 241 दिवसात केला होता. सदरचा उच्चांक मोडून यंदाच्या गळीत हंगामात 1 मे 2018 रोजी 177 दिवसांत 6 लाख 46 हजार मे. टन ऊस गाळप व 6 लाख 90 हजार साखर पोत्यांची निर्मिती करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

तसेच डिस्टीलरी प्रकल्पाद्वारे यापूर्वीचा सन 2007-08 मध्ये 210 दिवसात 41 लाख लिटर्स अल्कोहोल निर्मितीचा विक्रम मोडला गेला असून यंदाच्या गळीत हंगामात 177 दिवसात 52 लाख लिटर्स अल्कोहोल निर्मितीच्या नव्या विक्रमाची नोंद झाली.

त्याचप्रमाणे नोव्हेंबर 2011 मध्ये कार्यान्वित झालेल्या सहविजनिर्मिती प्रकल्पाद्वारे यापूर्वी सन 2014-15 च्या गळीत हंगामात 5 कोटी 58 लाख 90 हजार युनिटस् वीज निर्मिती आणि 3 कोटी 88 लाख युनिटस्ची महावितरण कंपनीला विक्री करून 24 कोटी 37 लाख रुपयांच्या उत्पन्नाचा उच्चांक होता. वीजनिर्मितीचा उच्चांकही यंदाच्या गळीत हंगामात 5 कोटी 75 लाख युनिटस्ची वीजनिर्मिती व 3 कोटी 93 लाख युनिटस्ची महावितरण कंपनीला विक्रीद्वारे 25 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. 

अशोक कारखान्याच्या या ऐतिहासिक विक्रमाबद्दल कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक, ऊसतोडणी मजूर, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांसह कारखान्याचे सूत्रधार माजी आ. भानुदास मुरकुटे, अध्यक्ष सोपानराव राऊत, उपाध्यक्ष भाऊसाहेब उंडे, कार्यकारी संचालक लक्ष्मण गाढे, तसेच संचालक मंडळाने तसेच सभासदवर्ग आणि कामगारांनी अभिनंदन केले आहे.