Fri, May 29, 2020 00:49होमपेज › Ahamadnagar › पाच लाख शेतकर्‍यांना ‘मृद आरोग्य पत्रिका’!

पाच लाख शेतकर्‍यांना ‘मृद आरोग्य पत्रिका’!

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 13 2018 11:29PM नगर : प्रतिनिधी

रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करुन कमी करुन, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मातीचे नमुने तपासण्यात येत आहेत. तपासणीनंतर शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. यंदा जिल्ह्यातील चार लाख 78 हजार 47 शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे.

जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळेमार्फत हे जमिनीचे मृद नमुने काढून तपासणी नंतर आरोग्य पत्रिका वितरीत करण्याचे काम सुरु आहे. वर्षभरात 2 लाख 89 हजार 9 मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात 1 लाख 9 हजार 892 मृद नमुने काढण्याचा लक्षांक आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार 399 मृद नमुने काढण्यात आले. एकूण लक्षांकापेक्षा जास्त नमुने घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत त्यापैकी 95 हजार 850 मृद नमुने तपासण्यात आले. आहेत. येत्या मार्च अखेरपर्यंत सर्व आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्याचे उद्दिष्ठ आहे.

रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर व अन्य कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकर्‍याला दर तीन वर्षांनंतर त्याच्या शेताची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन घ्यावयाची आहे.

शेतकर्‍यांना जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून त्याच्या जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती देण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाचा 50 टक्के व राज्य शासनाचा 50 टक्के आर्थिक सहभाग आहे. मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खत, निंबोळी / सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणार्‍या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे असा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

आरोग्य पत्रिकेत देण्यात येणार्‍या विश्लेषणामध्ये मातीचा सामू व क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश, मुक्त चुना, सोडियम, सूक्ष्म मूलद्रव्ये आदि घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. मृद आरोग्य पत्रिकेत जमिनीचे आरोग्य म्हणजेच त्यातील घटकांची मात्रा सांगितली जाणार आहे. सुपीकता पातळीनुसार रासायनिक व सेंद्रिय खतांची मात्रा किती प्रमाणात वापरावी, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.