Sat, Feb 23, 2019 10:08होमपेज › Ahamadnagar › शिंगणापूरमध्ये पाच लाख भाविक

शिंगणापूरमध्ये पाच लाख भाविक

Published On: Aug 12 2018 1:00AM | Last Updated: Aug 11 2018 11:58PMसोनई : वार्ताहर 

शनी अमावस्येनिमित्त शनिवारी लाखो भाविकांनी शनी शिंगणापूर येथे येऊन दर्शन घेतले. गेल्या 3 ते 4 वर्षांतील गर्दीचा हा उच्चांक आहे. शनी मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते.दिल्ली, हरियाणा येथील भाविकांनी दरवर्षीप्रमाणे येणार्‍या भाविकांना मोफत अन्नदान केले. मध्यरात्रीच्या महापूजा हिवरे बाजाराचे पोपटराव पवार, राकेश कुमार, सौरभ बोरा यांच्या हस्ते झाली. पहाटेची महापूजा औरंगाबादचे खा. चंद्रकांत खैरे, झिम्बाब्वे येथील शनिभक्‍त जयेश शहा, डेंटल कौन्सिलचे राहुल हेगडे यांच्या हस्ते करण्यात आली. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दुपारी शनिअभिषेक करून दर्शन घेतले. आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते, विघ्नहर्ता कारखान्याचे सत्यशील शेरकर, संभाजीराव दहातोंडे, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. विलास लांडे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर, तसेच अधिकार्‍यांनीही दर्शन घेतले.

शनिभक्‍तांसाठी देवस्थानने पिण्याचे पाणी, आरोग्य तसेच विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या. शिर्डी रस्त्यावर मुळा कारखाना, घोडेगाव रस्त्यावर शिंगणापूर हॉस्पिटलजवळ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणावरून भाविक पायी चालत येत होते. देवस्थानचे विश्वस्त दीपक दरंदले, वैभव शेटे, योगेश बानकर, शालिनी लांडे यांनी आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला.