Fri, Jul 19, 2019 13:40होमपेज › Ahamadnagar › पाच छावणीचालकांवर गुन्हा दाखल

पाच छावणीचालकांवर गुन्हा दाखल

Published On: Feb 10 2018 2:08AM | Last Updated: Feb 10 2018 1:58AMजामखेड : प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात दुष्काळामुळे सन 2012-13 व सन 2013-14 साली 39 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यातील पाच छावण्यांच्या नोंदींत अनियमितता आढळली होती. त्यामुळे प्रभारी तहसीलदार विजय भंडारी यांच्या आदेशानुसार काल (दि.9) मंडलाधिकार्‍यांनी या छावणीचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र काही छावणीचालकांच्या अनियमिततेकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचा काही संघटनांनी आरोप करून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

 तालुक्यात सन 2012-13 व 2013-14 साली दुष्काळ पडला होता. त्यामुळे   दुष्काळी भागात जनावरांच्या  39 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावणीचालकांवर टंचाई शाखेने अनियमितता आढळल्याने दंड केला होता. जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील छावणीचालकांवर गुन्हे दाखल झाले होते. परंतु जामखेड येथे तहसील प्रशासनाने दोन दिवस उशिरा म्हणजे शुक्रवारी (दि.9) गुन्हे दाखल केले. 

  खर्डा येथील मंडलाधिकारी विकास पाचारणे व अरणगाव येथील मंडलाधिकारी रामकिसन कोळी यांनी फिर्याद दिली. त्यात सन 2012-13 व 2013-14 मध्ये या पाच छावण्यांतून बाहेर गेलेल्या जनावरांची नोंद जावक रजिस्टरमध्ये न घेणे, तसेच जनावरे बाहेर घेऊन जाण्याचे संबंधित शेतकर्‍यांकडून अर्ज न घेणे, छावणीतील प्राप्त चारा, पशुखाद्य, मिनरल मिक्सर यांची नोंद अद्ययावत न ठेवणे, अशी अनियमितता आढळल्याचे म्हटले आहे. कर्जत येथील अम्मा भगवान सामाजिक मंडळाचे (कर्जत) प्रकाश खोसे यांनी गिरवली छावणी सुरू केली होती. तिला प्रत्येकी 4 हजार 630  व 4 हजार 200 रुपये, सरदवाडी येथील जयराम मंजूर सह. संस्थेचे पांडू उबाळे यांनी अरणगाव येथे छावणी सुरू केली होती.  या छावणीस अनुक्रमे  3 हजार 430 व 20 हजार 650 रुपये दंड करण्यात आला होता. डोणगाव येथील खेमानंद दूध उत्पादक संस्थेचे बाळासाहेब यादव यांनी सुरू केलेल्या छावणीस 17 हजार 415 रुपये दंड करण्यात आला होता.  खर्डा येथील छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे विजय गोलेकर यांनी खर्डा येथे छावणी सुरू केली होती. त्यांना 4 हजार 630 व 4 हजार 200 रुपये दंड करण्यात आला होता. मुंगेवाडी येथील कानिफनाथ मजूर सह. संस्थेचे भास्कर गोपाळघरे यांच्या छावणीस 650 रुपये दंड करण्यात आला होता. वरील पाच छावणीचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. काही छावणीचालकांना या कारवाईतून वगळण्यात आल्याचा आरोप करून, या प्रकरणी न्यायालयाच जाण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.