Sun, Jun 16, 2019 02:35होमपेज › Ahamadnagar › मागेल त्याला मत्स्यबीज व सबसीडीही देणार : महादेव जानकर

मागेल त्याला मत्स्यबीज व सबसीडीही देणार : महादेव जानकर

Published On: Jul 08 2018 1:42AM | Last Updated: Jul 07 2018 11:18PMराहुरी : प्रतिनिधी

मत्स्यमारीतून उत्कर्ष व्हावा म्हणून जपान तंत्रज्ञानाच्या फायबर बोटी देऊन नगर जिल्ह्यातून पायलट प्रकल्प सुरू केला जाईल. तसेच मागेल त्याला मत्स्यबीज व सबसिडीही देण्यात येईल, अशी घोषणा पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यउद्योग मंत्री महादेव जानकर यांनी केली.

राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या सभागृहात राजश्री शाहू महाराज यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन व जलाशयात पिंजरा पध्दतीने मत्स्यपालन याविषयावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली़ त्यावेळी जानकर बोलत होते.

ना. जानकर म्हणाले, जिल्ह्यात मत्स्य व्यवसायातून एक लाख लोकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. दुसर्‍या राज्यातून मत्स्यबीज आणण्याचे उद्योग बंद करायचा असून पुढील वर्षी अन्य राज्यांना मत्स्यबीज पुरविण्यात येईल़ लवकरच मत्स्यशेतीबाबत महाराष्ट्र देशात एक क्रमांक राहील, असेही त्यांनी सांगितले़  

मत्स्यबीज सेंटरसाठी 22 हजार कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे़ येथून पुढे जे अधिकारी योजना राबविण्यात कुचराई करतील त्यांची गडचिरोलीत बदली करू व वेतनवाढ रोखून धरू, असा इशाराही महादेव जानकर यांनी दिला.  मत्स्यव्यवसायानेच दीडपट उत्पन्न वाढणार आहे. कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली असून राज्य शासन खरेदीची हमी घेईल, अशी ग्वाही जानकर यांनी दिली.

यावेळी मत्स्य विभाग आयुक्त अरूण विधळे, सहा. आयुक्त नागेश भादुले, रासपा प्रदेशाध्यक्ष दादासाहेब केसकर, जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, युवक अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा जर्‍हाड आदी उपस्थित होते. 

अन् जानकरांना आला राग....!

ना. जानकर यांचे संत गाडगे महाराज आश्रम शाळेत आगमन झाले. शनिवार असल्याने विद्युत पुरवठा बंद होता. वीज का बंद आहे. मी येणार म्हणून अधिकार्‍यांना माहीत नव्हते का, थांबा कारवाईच करतो, असा राग त्यांनी व्यक्त केला तसेच  भाषण सुरू असताना माईकला येणार्‍या व्यत्ययाबाबतही अधिकार्‍यांची त्यांनी खरडपट्टी केली. तुमचे कायम असेच असते, असे सांगत पुन्हा गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.