Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Ahamadnagar › किसनगिरीनगरला रंगले देवगड दिंडीचे रिंगण

किसनगिरीनगरला रंगले देवगड दिंडीचे रिंगण

Published On: Jul 12 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 10:22PMनगर : प्रतिनिधी

अतिशय शिस्तप्रिय समजल्या जाणार्‍या देवगड दिंडीचा पहिला रिंगण सोहळा काल (दि.11) पाईपलाईन रस्त्यावरील संत किसनगिरी नगर येथे पार पडला. या रिंगण सोहळ्याने नगरकरांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटली.

या दिंडीचे काल पाईपलाईन रोड येथे आगमन झाल्यानंतर नागरिकांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्तधाम मंदिर परिसरात दिंडीचे आगमन झाल्यानंतर हभप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते किसनगिरी महाराज यांच्या पादुकांचे पूजन  करण्यात आले. त्यानंतर येथे दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. या रिंगणात तीन अश्‍व पळत होते.

सारंगधर पानखडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून भगवा ध्वज हाती घेऊन वेगाने घोडदौड करीत रिंगण पूर्ण केले. रिंगणाभोवती झेंडेकरी भगवे झेंडे घेऊन गोल उभे होते. हा रिंगण सोहळा पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. नगरकरांचे डोळ्यांचे पारणे फिटले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दिंडीचे स्वागत

सावेडी उपनगरातील प्रभाग क्र. 2 च्या वतीने नगरसेविका रुपाली वारे व माजी नगरसेवक निखिल वारे यांनी देवगड दिंडीचे काल (दि.11) दुपारी 12 वाजता वसंत टेकडी येथे स्वागत केले. हभप भास्करगिरी महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून वारे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वसंत टेकडी, अर्बन बँक कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा प्रथमच वसंत टेकडी वरील रिंगण सोहळा रद्द करण्यात आला. पाईपलाईन रस्त्यावरील किसनगिरी नगरमध्ये देवगडची प्रतिकृती असलेल्या दत्त मंदिरात दुपारचा सोहळा साजरा झाला.