Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › गोदावरी बायोरिफायनरीज कंपनीत आग

गोदावरी बायोरिफायनरीज कंपनीत आग

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 21 2018 12:58AMकोपरगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील साखरवाडी (वारी) येथील गोदावरी बायोरिफायनरीज कंपनीत शुक्रवारी दुपारी तीन वाजता कंपनीच्या परिसरातील क्रोटोहल्डाहाईड या केमिकलने भरलेल्या बॅरल व रिकाम्या बॅरलला स्पार्किंग होऊन आग लागून 5 हजार बॅरल आगीत भस्मसात झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी व कुणीही जखमी झाले नाही. आग चार तास धुमसत होती. दरम्यान, संजीवनी, सोमैया, कोळपेवाडी कोपरगाव पालिका, वैजापूर, राहुरी, शिर्डी संस्थान, गणेशनगर, राहाता येथून अग्निशमन बंबांना पाचारण करून आग चार तासांत फोम व वाळूच्या साह्याने आटोक्यात आली. सोमैया ग्रुपच्या गोदावरी बायोरिफायनरिजच्या अद्ययावत फायर हँडरंट सिस्टीम व अल्डिहाईड स्टोअरेन स्प्रिंकलर सिस्टीम जॅकी पंप मोठा फायर पंप असल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे कंपनीचे एक ते दीड कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे कळते. 

दरम्यान, आगीची माहिती वार्‍यासारखी कोपरगावसह अन्य तालुक्यांत पसरली. साखरवाडीपासून सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर परिसरात आगीचे धुराचे लोट पसरले होते.धुरामुळे काहींना त्रास झाला. 
गोदावरी बायोरिफायनरिजचे  संचालक एस मोहन, एस आर ढमाले, व्यवस्थापक सेफटी ऑफिसर एस. ए सरोदे, फायर असिस्टंट संदीप रक्ताटे, प्रॉडक्शन मॅनेजर यू. एस. मोरे, क्रोटोप्लँट इन्चार्ज योगेश निर्मळ, अनिलकुमार घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. कंपनीचे महाव्यवस्थापक मधुकर दरोडे यांनी तहसीलदार किशोर कदम यांच्यासमोर दिलेली माहिती अशी की, गोदावरी बायोरिफायनरिजने  गोदावरी नदीकाठी विविध वृक्षारोपण केले असून, त्याची पाहणी करण्यासाठी मुंबईहून संदीप गुप्ता, प्रशांत उत्तेकर, अनिल अटक आदींचे पथक आले होते. त्यांच्यासोबत आपण पाहणी करत असताना क्रोटोहल्डाहाईड या प्लँट लगत असलेल्या रिकाम्या बॅरलमध्ये क्रोटोहल्डाहाईड भरण्याचे काम सुरू होते. 

बॅरलमध्ये स्पार्किंग होऊन अचानक आग लागली तेव्हा आम्ही सर्वजण घटनास्थळी पोहोचलो. अग्निशमन सेवेची यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.या कंपनीत तीन शिफ्टमध्ये 330 कामगार काम करीत असतात. शुक्रवारी दुपारच्या शिफ्टमध्ये 70 ते 80 कामगार कार्यरत होते. या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. कंपनीच्या बाहेर ही घटना घडली. तहसीलदार किशोर कदम हे घटनास्थळी ठाण मांडून होते.क्रोटोहल्डाहाईड प्लँन्टला आग लागल्याची घटना झाली. तेथेच शेजारी मिथाईल टु पेटेंट ओ (एमपीओ) हा रासायनिक ज्वलनशील पदार्थाचा प्लँट जवळच होता, पण आग विझविण्यासाठी फोमचा वापर केल्याने त्याच्याभोवती ही आग आम्ही पोहोचू दिली नाही.

दरम्यान,  या कंपनी संरक्षक भिंतीलगतच प्राथमिक शाळा व चेतना मंगल कार्यालय असून तेथे शुक्रवारी काजळे व मढवई या दोन कुटुंबांचा लग्नसमारंभ होता. तो नुकताच आटोपला होता. आगीची घटना घडताच येथील वर्‍हाडी मंडळींना तातडींने सुरक्षास्थळी हलविले. तसेच गांधी मैदान परिसरालगत असलेल्या रहिवासी निवास वसाहतीमधील रहिवाशांना तातडीने नदी परिसरात जाण्यांस सांगितले. हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला. ही घटना घडल्याने अनेक अफवा पसरल्या होत्या. घटनेसंदर्भात गोदावरी बायोरिफायनरिजचे संचालक एस मोहन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही. यापूर्वी साखरवाडी येथीलच सोमैया ऑरगॅनो केमिकल्सला 80 व 85 मध्ये अशीच आगीची घटना झाली होती. त्यानंतर संजीवनी कारखाना परिसरात बजाज ऑरगॅनो केमिकल्समध्ये 14 डिसेंबर 2005 रोजी, तसेच कोपरगाव औद्योगिक वसाहतीत साईनाथ केमिकल्स मध्ये 17 जानेवारी 2010 रोजी आगीच्या घटना घडल्या. त्यात  10 जण ठार तर 22 जण जखमी झाले होते.

Tags : Ahmadnagar, Fire,  Godavari Biophilierries Company