होमपेज › Ahamadnagar › जिल्हा विभाजनाबाबत समिती नेमा

जिल्हा विभाजनाबाबत समिती नेमा

Published On: Mar 25 2018 1:44AM | Last Updated: Mar 24 2018 11:19PMसंगमनेर : प्रतिनिधी

नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच आहे. त्यासाठी लागणारा निधीही सरकार देणार आहे. मात्र, या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे करायचेे, यासंदर्भात  निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधासभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि आ. बाळासाहेब थोरात या जिल्ह्यातील तीन नेत्यांची एकत्रित समिती स्थापन करावी. तेे जो निर्णय देतील, तो सरकारला मान्य राहील, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल संगमनेरमध्ये दिली.

महाराष्ट्र दिनी राज्यातील अनेक मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन होणार आहे. त्यात पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या नगर  जिल्ह्याचेही विभाजन होणारच आहे. याचा विडा  पालकमंत्री  शिंदे  यांनी उचलला आहे. त्या दृष्टीने संगमनेर जिल्हा कृती समितीची स्थापना करून सह्यांची मोहीम राबविली आहे. जवळपास 70 हजारांच्या पुढे सह्या झाल्या आहेत. लवकरच 1 लाख सह्यांचा टप्पा कृती समिती पार करणार आहे.

संगमनेर हेच जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी कसे उपयुक्त आणि मध्यवर्ती ठिकाण आहे, याबाबत संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीने ना. मुनगंटीवार व पालकमंत्री शिंदे यांना निवेदन देण्यात आले. 

त्याचा धागा पकडून पालकमंत्री शिंदे म्हणाले, जिल्ह्याचे विभाजन करायचे, असे मी एकटाच म्हणत होतो. मात्र, आता संगमनेरात ना.मुनगंटीवार  व मला बसस्थानकावर अडवून संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे, याचे कृती समितीने साकडे घातले. त्यामुळे आता माझ्याबरोबर अर्थमंत्री असल्यामुळे मी या जिल्ह्याचे विभाजन करणारच असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केले.

ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी संगमनेरला काही तासासाठी आलो आहे. मात्र, 25 वर्षांपासून राज्याचे माजी महसूल मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचे हे  गाव आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकाळातच हा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, त्यांच्याकडून ते होऊ शकले नाही. परंतु, आता जिल्हा विभाजन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी यासाठी निधी देणारच आहोत. फक्‍त, जिल्ह्याचे मुख्यालय कोणते करायचे, हे ठरविण्यासाठी पालकमंत्री  शिंदे, विरोधी पक्षनेते विखे व माजी महसूल मंत्री थोरात यांनी एकत्रित समिती स्थापन करून निर्णय घ्यावा. या तिघांच्या समितीने दिलेला निर्णय आम्हाला मान्य राहील, असे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Tags : ahmednagar, Finance Minister Sudhir Mungantiwar, statement,