Sat, Feb 16, 2019 04:59होमपेज › Ahamadnagar › नगर : साईबनचे संचालक, बोटचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

नगर : साईबनचे संचालक, बोटचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर: प्रतिनिधी

साईबन कृषी पर्यटन केंद्रातील जलाशयात बोट उलटण्याची घटना घडली़ यातून आठ पर्यटकांना चार तरुणांनी मोठ्या शिताफिने वाचविले. या प्रकरणी सोमवारी संदीप बाळकृष्ण सप्रे (रा. स्टेशन रोड, नगर) यांनी बोटचालकासह साईबन केंद्राच्या संचालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

साईबन येथे संदिप सप्रे यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुले तसेच त्यांचे इतर चार नातेवाईक असे आठ जण रविवारी पिकनिकसाठी गेले होते. सायंकाळी चार वाजता केंद्रातील जलाशयात ते बोटिंगसाठी गेले. यावेळी ६ सीटर बोटमध्ये चालक धरून नऊ जणांना बसविण्यात आले. या बोटीचे दोन पैकी एक पॅडल निकामी होते. बोटीमधून जलाशयाला एक चक्कर मारल्यानंतर किना-याकडे येत असता बोटीत मागच्या बाजुने पाणी शिरत होते़ याबाबत बोटचालकाला सप्रे यांनी कल्पना दिली होती. त्याने मात्र दुर्लक्ष केले. त्यानंतर काही क्षणातच बोट उलटली. यावेळी सर्व आठ जण पाण्यात पडले. बोटलचालकाने बुडणा-यांना काहीच मदत न करत तो पोहोत पाण्याबाहेर गेला. 

सप्रे यांना पोहोता येत असल्याने त्यांनी त्यांची पत्नी व एका मुलाला बाहेर काढले. यावेळी जलाशयाशेजारी उपस्थित असलेल्या देवेंद्र बेरड, संतोष लोंढे, विलास माने व मनोज गाडळकर यांनी पाण्यात उडी घेऊन उर्वरित लोकांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला.

साईबनच्या जलाशयात सुरक्षा जॅकेट, सुरक्षा रक्षक, लाईफ गार्ड, सुरक्षा ट्यूब, रोरी असे कोणतेही साहित्याची व्यवस्था केलेली नाही. तसेच बोटचालकास प्रशिक्षण दिलेले नसल्याचे दिसले, असे संदिप सप्रे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी पोलीसांनी कलम २८०, ३३६ व ४२७ प्रमाणे बोटचालकासह साईबनच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.