Mon, Jul 06, 2020 10:39होमपेज › Ahamadnagar › आठ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

आठ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:54PMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकार्‍यांनी शुक्रवारी न्यायालयात आठ आरोपींच्या विरोधात 1366 पानी दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपींमध्ये आ. संग्राम जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचा समावेश नसला तरी, सीआरपीसी 173 (8) नुसार कारवाईची तजवीज ठेवण्यात आल्याने या दोघांविरोधात नंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होऊ शकते. याप्रकरणी आज सुनावणी होईल.

येथील 5 वे सह दिवाणी न्यायाधीश सो. सु. पाटील यांच्या न्यायालयात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळ यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले. सुमारे साडेचार तास दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. केडगाव हत्याकांड घडल्यानंतर 90 दिवसांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या हत्याकांडातील आरोपींमध्ये तीन आमदारांचा समावेश असून, त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव उर्फ बी.एम. कोतकर, संदीप बाळासाहेब गिर्‍हे, महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांचा समावेश आहे.

केडगाव येथील महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 7 एप्रिल रोजी सायंकाळी संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर काही तासांतच मारेकरी संदीप गुंजाळ हा पारनेर पोलिस ठाण्यात शरण आला होता. 8 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना रविवार, दि. 8 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या प्रक्रियेला काल (दि. 6) 90 दिवस पूर्ण झाले. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना फायदा होऊ नये, यासाठी ‘सीआयडी’ने आरोपींविरुद्ध पहिले दोषारोपपत्र काल न्यायालयात दाखल केले.

दोषारोपपत्रातील आरोपींच्या विरोधात भा.दं.वि कलम 302 (खून करणे), 303 (पहिला खून केलेला असताना दुसरा खून करणे), 120 ब (गुन्ह्याचा कट रचणे), 143, 144, 145, 147, 148, 149 (सार्वजनिक ठिकाणी गुन्ह्याच्या उद्देशाने एकत्र येत दंगल करणे), 504 (जिवे मारण्याची धमकी देणे), 34 (संगनमत करणे), भारतीय हत्यार कायदा 3/25 (धारदार शस्त्र बाळगणे), 4/25 (पिस्तुलाचा वापर करणे) अशी कलमे लावण्यात आलेली आहेत.

या दोषारोपपत्रावर आज (दि.7) सुनावणी होणार आहे. दोषारोपपत्रात नाव न आल्याने आ. संग्राम जगताप यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र, सीआयडीच्या पथकाने पुढील तपासानंतर आ.जगताप यांच्यावर कारवाई करण्यासाठी कलम 173 (8) नुसार कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. त्यामुळे तूर्तास तरी आ. जगताप यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

कुठल्याही आरोपींना वगळणार नाही

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात एकूण आठ आरोपींच्या विरोधात काल दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, सर्व आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असून, कुठल्याही आरोपीला यातून वगळण्यात येणार नसल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळ यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

अन्य 22 आरोपींवर टांगती तलवार

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात एकूण 30 आरोपी आहेत. त्यापैकी सुरुवातीला पकडलेल्या दहा आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया काल (दि. 6) करण्यात आली. त्यापैकी 8 आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाले असून, इतर 22 आरोपींवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होण्याची टांगती तलवार आहे. या 22 आरोपींमध्ये आ. अरूण जगताप, आ. शिवाजी कर्डिले, संदीप कोतकर, औदुंबर कोतकर, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, राजू गांगड, आप्पा दिघे, बाबूराव कराळे, ज्ञानेश्वर कोतकर आदींचा समावेश आहे.