Wed, Jan 23, 2019 14:47होमपेज › Ahamadnagar › ‘एसपीं’वर खुनाचा गुन्हा दाखल करा!

‘एसपीं’वर खुनाचा गुन्हा दाखल करा!

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 20 2018 11:40PMनगर : प्रतिनिधी

नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू पोलिसांनी कोठडीत केलेल्या मारहाणीमुळेच झाला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून ती दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणात पोलिस अधिक्षकांसह सर्वांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा. केडगाव हत्याकांड हे राजकीय वादातून नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांचा तपास न्यायालयाच्या नियंत्रणाखाली करावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केली आहे.

ना. विखे यांनी गिरवले यांच्या कुटुंबियांची काल (दि.20) भेट घेवून सांत्वन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केडगाव हत्यांकाडाची घटना निंदनीय आहे. त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. मात्र, शिवसेनेचे तीन मंत्री यासाठी नगरमध्ये येवून पोलिस यंत्रणेवर दबाव आणतात. ठराविक पक्षाच्या लोकांना अद्यापही अटक केली जात नाही. या घटनेला ते राजकीय स्वरुप देण्यात आले आहे. मात्र, ही घटना निवडणुकीच्या वादातून तसेच राजकीय वादातून झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे याची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी. तसेच गिरवले यांना कोठडीत अमानुष मारहाण झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक्षकांसह सर्वांवर खुनाचे गुन्हे दाखल करावेत. ससून येथे डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व घटना गंभीर असून याबाबत सर्वांचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व नियंत्रणाखाली व्हावा, अशी मागणी विखे यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags : Ahmadnagar, File,  murder,  SP