Sun, May 26, 2019 21:33होमपेज › Ahamadnagar › सरकारवरच फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

सरकारवरच फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:33PMजामखेड : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. तो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, त्यामुळे सरकारची ही फसवी घोषणा आहे.  शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवरच गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केली. हे तुघलकी सरकार शेतकरी विरोधी असल्याने आता त्यांना घालविण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

शासनाच्या वतीने शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिव्हाळा फाऊंडेशन, स्वाभिमान शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने खर्डा चौकातून सोमवारी दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, प्रा. मधुकर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ऋषीकेश डुचे, लक्ष्मण कानडे, शहाजी डोके, अवधूत पवार, रमेश आजबे,  शेरखान पठाण, भानुदास बोराटे, दत्तात्रय विष्णू वारे, नामदेव राळेभात, सिध्दार्थ घायतडक, गुलाब जांभळे,  चंद्रकांत साळुंके, गणेश हगवणे, डॉ कैलास हजारे, भीमराव पाटील, अमित जाधव, कुंडल राळेभात, हरिभाऊ खवळे, जयसिंग उगले राजु वारे, अमोल गिरमे, संभाजी ढोले, हभप लक्ष्मण औसरे महाराज,  शिवाजी सातव, तात्या मुरुमकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हमीभाव केंद्रच सुरू करण्यात आले नसल्यामुळे कवडीमोल दराने मालाची विक्री शेतकर्‍यांना करावी लागणार आहे. शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.त्यामुळे शासकीय खरेदी हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी पिक पिकत नाही म्हणून आत्महत्या करत होता. आता पिकलेले पिक विकत नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. याला शासन जबाबदार आहे. हमीभाव केंद्र तालुक्यात मंडलनिहाय सुरू करण्यात यावे अशा मागण्या यावेळी विविध मान्यवरांनी भाषणातून केल्या. यावर तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी लेखी पत्र मोर्चेकरांना दिले. सुमारे पाच तासानंतर हा मोर्चा संपला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते आहे.