Tue, Jun 25, 2019 13:28होमपेज › Ahamadnagar › व्हॉटसअ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर; दोन गटांमध्ये मोठा ‘राडा’

व्हॉटसअ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर; दोन गटांमध्ये मोठा ‘राडा’

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 12:06AMसंगमनेर : प्रतिनिधी

शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणार्‍या एका समाजातील  गटाच्या तरुणाने व्हॉटसअ‍ॅपचा वापर करून दुसर्‍या गटाबाबत आक्षेपार्ह मजकूर  टाकल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तिंनी राजापूर रस्त्यावरील एका दुकानाची तोडफोड केली. त्यामुळे शहरातील दोन गटांत तणाव निर्माण झाल्याप्रकरणी शहर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा, तर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणार्‍या रिझवान मोहंमद चौधरी (वय 38) या तरुणाने  सोशल साईटवर व्हॉटसअ‍ॅपचा ‘मीम’ नावाचा समूह तयार केला आहे. या समुहात एका समाजातील दोन्ही गटांतील तरुणांचा समावेश आहे. याच समुहात मंगळवारी (दि.13) इम्तियाज रहिमखान पठाण (रा.मोमीनपुरा) याने वादग्रस्त मजकूर टाकला. त्यामुळे शहरातील दोन गटांत तणाव निर्माण झाला. 

यादरम्यान जोर्वे नाका परिसरात काहीतरी गोंधळ उडाल्याची अफवा पसरल्याने पोलिस यंत्रणेचीही मोठी धावपळ उडाली. याप्रकरणी रिझवान चौधरी यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी इम्तियाज पठाण याच्यावर भादवि कलम 295 (अ) नुसार धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर आरोपी पसार झाला असून पोलिसांनी  ठिकठिकाणी छापे टाकून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. राजापूर रस्त्यावरील असलेल्या एका भंगार खरेदीच्या दुकानात मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच तरुणांनी धुडगूस घालत दुकानाची तोडफोड केली. 

यावेळी जमावातील अज्ञातांनी शिवीगाळ व धमकीही दिली. या प्रकरणी हिना मोहसिनखान पठाण (रा.राजापूर रोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात  दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार डी.आर.गोरे यांच्याकडे सोपविला आहे.

पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

एकाच समाजातील दोन गटांत निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू असतानाच नवीन नगर रस्त्यावरील भूमी अभिलेख कार्यालयाजवळील चौकाच्या नामकरणाचा वादही उफाळून आला होता. याबाबत सोशल साईटवरील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर तसा संदेश टाकणार्‍या तरुणास दुसर्‍या समाजातील तरुणांनी याच परिसरात गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, सुदैवाने शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकरसिंग राजपूत वेळीच तेथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. हे प्रकरण परस्पर सहमतीने मिटवण्यात आले.