Wed, Nov 14, 2018 03:47होमपेज › Ahamadnagar › पंचायत समितीत चाळीस लाखांचा अपहार

पंचायत समितीत चाळीस लाखांचा अपहार

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:29AMजामखेड : प्रतिनिधी

मयत सेवानिवृत्तधारकांची नावे बँकेला दाखवून त्यांची निवृत्ती पेन्शनची रक्कम स्वतःच्या खात्यावर जमा करण्याचा गेेली दीड वर्षांपासून  सुरू असलेला प्रकार जामखेड पंचायत समितीत उघड झाला आहे. याची वाच्यता होताचा संबधीत कर्मचारी दोन दिवसांपासून फरार झाला आहे.अपहार झालेली रक्कम अंदाजे चाळीस लाखाच्या घरात असल्याचे समजते. याबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लेखा व वित्त विभागाची त्रिसदस्यीय समिती पंचायत समितीत गुरुवारी दाखल झाली. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी यांनी विभागाला लावलेले सील तोडण्यास सांगून दोन वर्षांतील कालखंडातील सर्व कागदपत्रे तयार करण्यास सांगितले. संबंधित कर्मचार्‍याचे कागदपत्रे असलेले कपाटाचे सील आहे तसेच ठेवले आहे. 

पंचायत समितीकडून अधिक माहिती घेतली असता, जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीतील वेगवेगळ्या खात्यातील निवृत्त पेन्शनरची संख्या 650 च्या आसपास आहे. या पेन्शनरांचे काम पाहण्यासाठी पंचायत समितीत स्वतंत्र विभाग आहे. या सर्वांचे खाते सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, प्राथमिक शिक्षक बँक व जिल्हा सहकारी बँक शाखा जामखेड अशा वेगवेगळ्या बँकेत आहेत. 
 पंचायत समितीकडून जिल्हा सहकारी बँकेत 450 च्या आसपास निवृत्त पेन्शधारकांचे खाते आहेत. निवृत्तधारकांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेला निवृत्त धारकांची यादी व चेक दिला जातो. परंतु सदर कर्मचारी हा एक्सेल यादीतील नावामध्ये फेरफार करून मयत असणार्‍या निवृत्त कर्मचार्‍यांचे नाव व रक्कम दाखवून त्यापुढे स्वतःचा खाते नंबर टाकत असे. त्यामुळे ही सर्व रक्कम संबंधित कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा होत असे. प्रथमदर्शनी हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या नगर येथील अधिकार्‍यांना समजल्यानंतर त्यांनी जामखेड पंचायत समितीतील अधिकार्‍यांना सदर कर्मचार्‍यांचे कपाट सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संजय छैलकर यांना सील करण्याचे आदेश दिले. त्यावरून त्यांनी दि. 9 रोजी सील ठोकले. 

त्यानंतर गुरुवारी (दि. 10) जिल्हा परिषदेच्या उपमुख्यलेखा व वित्त अधिकारी श्रीमती वराडे, सहायक लेखा अधिकारी क्यातक व कुलकर्णी यांची त्रिसदस्यीय समिती दुपारी बारा वाजता जामखेड पंचायत समितीत दाखल झाली. यावेळी त्यांनी अर्थ विभागाचे संपूर्ण रेकॉर्ड मागवून घेतले व जवळपास तीन तास विचारविनिमय केला. त्यानंतर समितीने दोन वर्षांतील सर्व निवृत्तधारकांचे सेवापुस्तके, बिले, व्हाऊचर अशी कागदपत्रे शोधण्यास सांगितले. याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 

पंचायत समितीच्या या अपहार झालेला रकमेचा आकडा चाळीस लाखांच्या आसपास असला तरी तो वाढण्याची शक्यता आहे. कक्ष अधिकारी छैलकर हे गुरुवारी संबधीत कर्मचार्‍याच्या घरी जाऊन आले. परंतु तो घरी आढळून आला नाही. संबंधित कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पदाधिकारी पडले तोंडघशी

तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांनी संबंधित पेन्शधारक कर्मचार्‍याचा टेबल बदलला होता. परंतु सदर कर्मचार्‍याने पंचायत समिती पदाधिकारी यांच्याकडे विनवणी करून तोच टेबल परत मिळवला. आता अपहार रकमेचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पदाधिकारी तोंडघशी पडले आहेत.