Fri, Jul 19, 2019 22:11होमपेज › Ahamadnagar › खताचे दुकान आगीत भस्मसात

खताचे दुकान आगीत भस्मसात

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:15PM

बुकमार्क करा
श्रीरामपूर : प्रतिनिधी

शिवाजीरोडवरील किशोर थिएटर नजिक असणारे ‘उंडे अ‍ॅग्रो’ या खते व औषधांच्या दुकानास मंगळवारी रात्री दोन ते तीन वाजता आग लागली. शॉर्टसकिर्र्टमुळे लागलेल्या या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक होऊन सुमारे 40 ते 50 लाखांचे नुकसान झाले.

तालुक्यातील मातापूर येथील राहुल उंडे यांचे गिरमे बिल्डिंगमध्ये ‘उंडे अ‍ॅग्रो’ नावाने दुकान आहे. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. रात्री दोन वाजता शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या दुकानास आग लागली. दुकानाचे शटर बंद असल्याने आग आत मध्येच धुमसत राहिली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर शटरच्या फटीतून धूर व आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. दुकानात शेतीसाठी लागणार्‍या औषधांच्या बाटल्या असल्याने त्या फुटून फटाक्यासारखे आवाज येऊ लागले. त्यामुळे शेजारच्या इमारतीतील नागरिकांना जाग आली.  

या नागरिकांनी तात्काळ अग्नीशमन विभाग तसेच दुकान मालक उंडे यांना फोन केला. याचवेळी गस्तीवर असलेले पोलिसही या ठिकाणी आले. दुकानाला कुलूप असल्याने अग्निशमन गाडी येऊनही काही फायदा होईना. त्यामुळे टामीच्या साह्याने शटर उचकटून आत पाणी मारण्यास सुरूवात केली. दुकान मालक आल्यानंतर शहर उचकटून आग विझविण्यात आली.

या आगीत दुकानातील दोन संगणक, प्रिंटर्स, सीसीटीव्ही सेट, दुकानातील संपूर्ण फर्निचर, औषधे, बियाणे, खते, अकौटिंगची सर्व कागदपत्रे, बिलबुके, फॅन आदी वस्तू जळून खाक झाल्या.  उंडे यांच्या दुकाना शेेजारीच भगवानबाबा मल्टिस्टेट व गुरूमाऊली पतसंस्थेचे कार्यालय होते. या दोन्ही कार्यालयांना आगीचे झळ पोहोचली. परंतु सुदैवाने त्यांचे काहीही नुकसान झाले नाही.

पालिकेचा अग्निशमन विभाग झोपेत

शिवाजीरोडवरील उंडे अ‍ॅग्रो या दुकानाला रात्री आग लागल्यानंतर उपस्थित नागरिकांनी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात फोन लावला. पाच मिनिटे प्रयत्न करूनही फोन कोणीही उचलत नव्हते. त्यामुळे उपस्थित काही नागरिकांनी या विभागाकडे धाव घेतली असता सर्व कर्मचारी गाढ झोपेत होते. त्यांना अक्षरशः उठविण्याची वेळ नागरिकांवर आली. या दुकानापासून अग्नीशमन विभाग अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर आहे.