Sun, Apr 21, 2019 01:50होमपेज › Ahamadnagar › भोजापूर धरणाची उंची वाढविण्याबाबत फेरसर्व्हे

भोजापूर धरणाची उंची वाढविण्याबाबत फेरसर्व्हे

Published On: Aug 30 2018 1:15AM | Last Updated: Aug 29 2018 11:32PMतळेगाव दिघे : वार्ताहर 

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या भोजापूर धरणाची उंची वाढविण्याच्या मागणीकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधले. त्यावर भोजापूर धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात फेरसर्वेक्षण आणि धरणाच्या लाभक्षेत्रातील घटकांची मते जाणून घेवून तातडीने अहवाल सादर करा, अशा सूचना जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

संगमनेर व सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या भोजापूर धरणाची उंची 3 मीटरने वाढवावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. या मागणीसाठी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी आंदोलनेही केली आहेत. शासनाच्या विविध स्तरावर शेतकर्‍यांनी या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला असला तरी, ठोस निर्णय झालेला नाही. या भागातील शेतकर्‍यांनी विरोधी पक्षनेते विखे यांची भेट घेवून भोजापूर धरण आणि कालव्यांच्या प्रश्‍नाबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती.

बुधवारी (दि.29) मुंबईत ना. महाजन यांच्या दालनात जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्‍नांबाबत आयोजित बैठकीत ना. विखे  यांनी भोजापूर धरणाच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत सविस्तर निवेदन मंत्र्यांना सादर केले. बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव   पानसे, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कोईनकर, सहसचिव नागेश शिंदे , नाशिक मंडळाचे मुख्य अभियंता के. बी कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, अभियंता अहिरराव, कार्यकारी अभियंता संगिता जगताप, अभियंता बागुल उपस्थित होते.

या बैठकीत भोजापूर धरणाच्या प्रलंबित कामांची तातडीने चौकशी करावी आणि ही कामे जलसंपदा विभागानेच करावीत, अशी मागणी ना. विखे  यांनी प्राधान्याने केली. दरम्यान, भोजापूर धरणाच्या संदर्भात असलेल्या प्रश्‍नांचे गांभिर्य आपल्याला निश्चित असून या प्रश्‍नांबाबत स्थानिक पातळीवर मतमतांतरे असतील, धरणाची उंची वाढविल्यास बुडीत क्षेत्र किती असेल, या बाबत फेरसर्वेक्षण करून आणि या भागातील घटकांची मते जाणून घेवून लवकरात लवकर अहवाल सादर करा, अशा सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या आहेत.