Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Ahamadnagar › दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरू

दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरू

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 14 2018 12:48AMपारनेर : प्रतिनिधी

लाभार्थ्यांच्या प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी आयोजित करण्यात ग्रामसभेची निश्‍चित तारीख सांगण्यास असमर्थता दर्शविण्यात आल्याने प्रांताधिकारी गोविंद दाणेज व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्यात शाब्दीक चकमक होताच अन्यायग्रस्त महिला व पुरूष लाभार्थी प्रांताधिकार्‍यांवर धावून गेले. पोलिसांनी संरक्षण देत प्रांतांना तहसीलदारांच्या दालनात नेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. काहीच तोडगा न निघाल्याने दुसर्‍या दिवशीही लंके यांच्यासह अन्यायग्रस्तांचे उपोषण सुरूच होते.  

तहसीलदार भारती सागरे, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी चर्चा करूनही पहिल्या दिवशी लंके यांच्या उपोषणात तोडगा निघू शकला नाही. दिवसभरानंतर रात्री उशिरापर्यंत लंके समर्थक उपोषणस्थळी येत होते. पावसाची रिपरिप सुरू असल्याने आंदोलकांनी आहे त्याच जागेत रात्र जागून काढली. शुक्रवारी स. 9 वाजल्यापासून पारनेरसह नगर तालुक्यातील लंके समर्थक आंदोलनस्थळी जमले. लंके हे गोरगरीबांच्या अनुदानासाठी लढा देत आहेत, प्रशासनाने अंत न पाहता हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात येत होती. दुपारी 12 वाजले तरी प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने शिवबा संघटना, भूमिपूत्र संघटना, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेड, प्रेरणा प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी अचानक तहसीलसमोर रास्तारोको आंदोलन सुरू केले. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस निरीक्षक गाडे यांनी तहसीलदार सागरे यांच्याशी संपर्क केल्यानंतर आपण अहवाल प्रांताधिकारी दाणेज यांना पाठविला आहे, तेच निर्णय घेतील असे सांगितले. त्यानंतर गाडे यांनी दाणेज यांच्याशी संपर्क साधला. दाणेज नगरहून पारनेरकडे निघाल्याचा निरोप मिळाल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. अनिल देठे, अनिल शेटे, प्रितेश पानमंद, उत्‍तम चौधरी, विजय औटी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रास्तारोकोमध्ये सहभागी झाले होते. 

प्रांताधिकारी दाणेज यांनी लंके यांच्याशी चर्चा करताना ग्रामसभेतील निर्णयाशिवाय पैसे वर्ग करणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर ग्रामसभा कधी घेणार, अशी विचारणा लंके यांनी केली. त्यावर तो अधिकार गटविकास अधिकार्‍यांचा असल्याने ते सांगता येणार नाही, असे उत्‍तर प्रांताधिकार्‍यांनी दिले. त्यावेळी लंके व दाणेज यांच्यात शाब्दीक चकमक झाली. चकमक होताच महिला व पुरूष आंदोलक दाणेज यांच्या दिशने धावून गेले. प्रसंगावधान राखून पोलिसांनी दाणेज यांना तहसीलदारांच्या दालनात नेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. लंके व दाणेज यांच्यातील वादानंतर लंके समर्थकांनी तहसीलदारांच्या दालनात दाणेज यांच्याशी पुन्हा चर्चा केली. मात्र ग्रामसभेच्या तारखेचा मुद्दा उपस्थित करून लंके यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. दुसर्‍या दिवशीही या आंदोलनाची कोंडी फुटू शकली नाही. सुदाम पवार, दादा शिंदे, अभयसिंह नांगरे, बापू शिर्के, कारभारी पोटघन, बाळासाहेब नरसाळे, अरूण पवार, ठकाराम लंके, संदीप मगर आदींसह शेकडो कार्यकर्ते, लाभार्थी दिवसभर ठाण मांडून होते.