Wed, Jul 17, 2019 18:47होमपेज › Ahamadnagar › बदलत्या हवामनामुळे शेतकरी धस्तावला

बदलत्या हवामनामुळे शेतकरी धस्तावला

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 11:48PMकर्जत : प्रतिनिधी

मागील वर्षी चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे खरिपाची पेरणी विक्रमी झाली होती. यावर्षी मात्र पावसाऐवजी जोरदार वारे सुटत असल्याने शेतकरी धस्तावला आहे. 

यावर्षीही सरासरी एवढा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तालुक्यातील जवळपास सर्व भागामध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्साह वाढला होता. वातावरण या पुढेही चांगला पाऊस पडेल असे होते. मान्सूनही वेळेवर आला होता. असे असताना अचानक पाऊस गायब झाला असून जोरदार वारा सुटत आहे. त्यामुळे जमिनीमध्ये असलेला ओलावा झपाट्याने कमी झाला असून पिके सुकू लागली आहेत.

कर्जत तालुका झाला खरिपाचा

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरिप पिके घेण्यात येतात. यामध्ये मूग, उडीद, बाजरी, मका यासह काही कडधान्यांची पेरणी केली जाते. पूर्वी हा तालुका रब्बीचा होता. मात्र येथील शेतकरी कष्टाळू आहे. त्याने कष्टाने व  शेतीचे नियोजन करीत खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पाण्याची व्यवस्था असलेल्या जमिनीच्या क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांचा तालुका, अशी कर्जतची ओळख झाली आहे. सरकारदरबारी मात्र हा बदल अद्याप झालेला नाही.

जलयुक्त शिवारमुळे सिंचन वाढले

कर्जत तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे. भिमा, सिना, कुकडी व घोड या पाणी योजनांचे पाणी तालुक्याला मिळत असतानाच तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेचे मागील दोन ते तीन वर्षापासून जोरदार काम झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडविले जाऊन ते जमिनीत मुरवले जात आहे. त्यामुळे पाण्याची पातळी देखील वाढली आहे.

पेरण्या खोळंबल्या

कर्जत तालुक्यात अवकाळी दोन पाऊस चांगले झाले होते. शेतकर्‍यांनी उन्हाळ्यातच शेतीचे नांगरटीसह सर्व कामे करून ठेवली होती. प्रचंड उष्णतेने जमीनही चांगली तापली आहे. अवकाळी पावसामुळे जमिनीला पाणी मिळाले होते. आणखी दोन पाऊस झाले असते तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणी सुरू झाली असती. काही भागात तर अवकाळी पाऊस चांगला झाल्यावर जमिनीचा वापसा झाला की पेरणी करण्याचे शेतकर्‍यांनी ठरवले होते. 

मात्र मागील चार-पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण गायब झाले आणि जोरादार वारा सुटला आहे. त्यामुळे जमिनीची ओल देखील निघून गेली. आता पुन्हा चांगला पाऊस पडल्यावर नंतर वापसा झाल्यावर पेरण्या होणार आहेत. पावसाअभावी पेरण्या लांबल्या आहेत. त्याचा उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो आणि पिकांचे वेळापत्रकही बदलून जाईल. येत्या दोन दिवसांत मान्सून न परतल्यास कर्जत तालुक्यातील शेतकरी संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.