Wed, May 22, 2019 06:15होमपेज › Ahamadnagar › कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Jun 17 2018 1:34AM | Last Updated: Jun 16 2018 11:42PMनेवासा : प्रतिनिधी 

जमिनीचे गहाणखत करून देऊनही कर्ज न दिल्याने तालुक्यातील पाथरवाला येथील  शेतकर्‍याने कुकाणा येथील नारायणगिरी  पतसंस्थेत  विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (दि.16) सकाळी घडली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाध्यक्ष दत्तात्रय खाटीक यास अटक करण्यात आली आहे.  

नेवासा पोलिस ठाण्यात मयत राजेंद्र आसाराम गवळी (वय 40) यांचा चुलत भाऊ रामेश्वर भाऊसाहेब गवळी यांनी तक्रार दाखल केली आहे. राजेंद्र गवळी यांनी कर्ज न मिळाल्यास 5 जून 18 रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला होता. मात्र त्याची कोणीच दखल न घेतल्याने शनिवारी (दि.16) कुकाणा    येथील संत  नारायणगिरी महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी  पतसंस्थेमध्ये राजेंद्र यांनी कर्मचारी व पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र काहीच उपयोग होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील विष प्रशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पतसंस्थेच्या चालकाने त्यांना उपचारार्थ नगरला हलविले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.  

मयत राजेंद्र गवळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र खाटीक यांच्याशी चर्चा केली होती. त्या प्रमाणे 14 फेब्रुवारी 2018 रोजी गहाणखत करून कामगार तलाठ्यांनी पतसंस्था बोजाची  नोंद केलेली होती. पतसंस्थेने राजेंद्र यांच्या कागदपत्रामवर, चेकवर सह्या घेतल्या. मात्र कर्जाची रक्कम तीन लाख पन्नास हजार रुपये दिले नाही. वेळोवेळी कर्ज रकमेची मागणी करूनही रक्कम न मिळाल्याने माझी फसवणूक झाली. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले होते. त्या प्रमाणे शनिवारी सकाळी 11.30 वा. सुमारास पतसंस्थेमध्येच विषारी औषध घेभन आत्महत्या केली.

याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष सुदाम नारायण खाटीक व उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र खाटीक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाध्यक्ष दत्तात्रय खाटीक यास अटक करण्यात आली आहे. सपोनि शरद गोर्डे तपास करित आहेत. 

दरम्यान शोकाकबल वातावरणात राजेंद्र गवळी यांच्यावर रात्री उशिरा पाथरवाला येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.