Thu, Apr 25, 2019 03:55होमपेज › Ahamadnagar › बावीस वर्षांचा संघर्ष, पदरी मात्र निराशाच

बावीस वर्षांचा संघर्ष, पदरी मात्र निराशाच

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 11:01PMसुपा : सुभाष दिवटे

सुप्याची औद्योगिक वसाहत सजविण्यासाठी शेतजमीन देणार्‍या शेतकर्‍यांच्या पदरी आज 22 वर्षांनंतरही निराशाच पडली आहे. या शेतकर्‍यांनी संघर्ष केला. पण अन्यायाशिवाय हाती काहीच आले नाही. 

पारनेर तालुक्यातील खुर्द, वांघुडे बुद्रूक, हंगा, सुपा या चार गावच्या शेतजमिनी प्रशासनाने संपादित केल्या. शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरी, कमर्शिअल प्लॉट देण्याचे आश्‍वासन मिळाले होते. प्रत्यक्षात एकरी पंधरा हजार रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले. यातील चौदा ते पंधरा शेतकर्‍यांच्या संपूर्ण जमिनी संपादित करून त्यांना कायमचे भूमिहीन करून वार्‍यावर सोडण्यात आले आहे. भूमिहीन झालेले सर्वच शेतकरी अशिक्षीत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहात झाली आहे.

ज्या शेतकर्‍यांना कमर्शिअल प्लॉट देणार होते, त्या शेतकर्‍यांनी प्रत्येकी 3 हजार रुपये शासनास धनाकर्षाद्वारे (डिमांड ड्राफ्ट) अदा केले. मात्र अद्याप या शेतकर्‍यांच्या पदरीदेखील काहीच पडले नाही. जमीन संपादित करून अनेक मोठे व लहान उद्योग या औद्योगिक वसाहतीत सुरु झाले. वसाहतीतील प्लॉटचे मालक पुणे, मुंबईत आरामात बसून दुसरेच उद्योग चालवतात. मात्र सुपा औद्योगीक वसाहतीत येऊन कंपनी उभारू शकले नाहीत. उलट काहींनी दुसर्‍यांना चढ्या भावाने प्लॉटची विक्री करून पैसा कमावला आहे. चार वर्षांपूर्वी मोकळे प्लॉट बांधून घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोर जा, असा इशारा औद्योगिक वसाहत प्रशासनाने दिल्यामुळे काही प्‍लॉटवर बांधकाम करण्यात आले. काही करोडपती मालकांनी प्रशासनाला जुमानलेही नाही. त्यामुळे अनेक रिकामे प्‍लॉट पडून आहेत.

सुपा औद्योगिक वसाहती समोरून नगर-पुणे महामार्ग गेल्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीला विशेष महत्व आहे. पूर्वीचे शेतकरी अशिक्षीत असल्यामुळे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी एस्तावेजांवर अंगठे दिले. आमचे कुठेही अंगठे घ्या, पण आम्हाला कमर्शिअल प्लॉट शासकीय दराने द्या, अशी त्यांची मागणी होती. परंतु तसे न होता सन 1997 मध्ये या शेतकर्‍यांना भूमिहीन असल्याचे दाखले देण्यात आले. वास्तविक कोणाही शेतकर्‍याला भूमिहीन करण्याचा अधिकार शासनाला नाही. मात्र चौदा शेतकर्‍यांना 22 वर्षे औद्योगिक प्रशासनाशी लढूनही कमर्शिअल प्‍लॉट मिळालेले नाहीत. ‘पुढारी’ने या शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 

सुपा व रांजणगाव गणपती ता.शिरूर या दोन्ही गावच्या औद्योगिक वसाहतीची एकाच वेळी स्थापना झाली होती. रांजणगावच्या शेतकर्‍यांना जमिनीचा वाढीव मोबदला मिळाला. स्थानिक शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरी देण्यात आली. मग सुप्याच्या शेतकर्‍यांना वेगळा नियम कस, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. सुपा औद्योगीक वसाहतीत आजही काही शेतकर्‍यांची घरे आहेत. पारनेर गावातील व परिसरातील वाळूतस्कर प्लॉटचा ताबा घेतात. महिलांना शिवीगाळ करतात. याबाबत पोलिसांकडे मदत मागितल्यास तुमच्या नावचा सातबाराचा उतारा दाखवा, अशी मागणी पोलिसांकडून होते. मी ज्या जागेवर राहतो, ती माझी नसेल तर प्रशासनाने लेखी कळवावे. मी चुकीचा असेल तर जेल भोगायला तयार आहे, असे भास्कर मगर या शेतकर्‍याने सांगितले. आम्हाला वाढीव मोबदला नको, कमर्शिअल प्लॉट देऊन न्याय द्यावा, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.