Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Ahamadnagar › निळवंडे कालव्यांसाठी शेतकर्‍यांचा मोर्चा

निळवंडे कालव्यांसाठी शेतकर्‍यांचा मोर्चा

Published On: Mar 20 2018 2:25AM | Last Updated: Mar 20 2018 2:14AMनगर : प्रतिनिधी

  उत्तर नगर जिल्ह्याच्या 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले. परंतु अद्यापि कालवे बांधले नसल्याने, लाभक्षेत्रातील   शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत.कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत या मागणीसाठी तसेच कोपरगाव, शिर्डी व राहाता शहरांसाठी प्रस्तावित केलेल्या पाईपलाईनच्या विरोधात  निळवंडे पाटपाणी कृती समितीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

निळवंडे धरणासाठी 40 वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. 2008 पासून निळवंडेत पाणी अडविले जात आहे. सदर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही देखील कालव्यांअभावी लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही. धरण झाले, पण कालवे झाले नाहीत. कालव्यांसाठी अकोले, संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी अनेकदा आंदोलने केली. परंतु मागणी पूर्ण होत नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहे. याच धरणातील पाणी कोपरगाव, शिर्डी व राहाता शहरांसाठी पाईपलाईनव्दारे पळविण्याचा उद्योग सुरु आहे. तसा प्रस्ताव देखील दाखल झाला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्‍त झाले आहेत.

या  प्रस्तावाला विरोध करण्यासाठी तसेच कालव्यांचे कामे तात्काळ पूर्ण केली जावीत, या मागणीसाठी निळवंडे पाटपाणी कृती समितीचा भव्य मोर्चा काल (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सुखलाल गांगवे, उत्तमराव घोडके, हरीश चकोर, बाबा ओहोळ, राजेंद्र बावके आदींनी मनोगत व्यक्त केले. धरण कालव्यांच्या कामात हलगर्जीपणा करणार्‍या न्यू एशियन कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, निळवंडेच्या  पाण्यावर अतिरिक्‍त आरक्षण टाकण्यात येवू नये अन्यथा जनतेला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. सरकारने जनभावनेची दखल घेऊन निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी द्यावे, असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले. यावेळी कृती समितीचे ज्ञानेश्‍वर वर्पे, नानासाहेब शेळके, गंगाधर गमे, उत्तमराव घोरपडे , राजेंद्र सोनवणे आदींसह शेतकरी मोठया संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.