Sun, May 26, 2019 17:35होमपेज › Ahamadnagar › कर्जतला शेतकर्‍यांचे आंदोलन

कर्जतला शेतकर्‍यांचे आंदोलन

Published On: Apr 15 2018 1:35AM | Last Updated: Apr 15 2018 1:14AMकर्जत :प्रतिनिधी 

नीरव मोदी याच्या कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील जमिनीवर काल (दि. 14) सकाळी शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. यावेळी मोदीच्या येथील सोलर प्लांटचे नामांतर ‘डल्ला भगोडा सोलर प्लांट’ असे करण्यात आले. तसेच रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नरचा प्रतिकात्मक पुतळा झाडाला बांधून त्यावर चाबकाने आसूड ओडले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील व अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले.

यावेळी जलतज्ज्ञ मिलिंद बागल, प्रकाश थोरात, भीमराव खेडकर, सोन्याबापू गोयकर, संतोष माने, यशवंत खेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकर्‍यांना आमिष दाखवून अल्प दरात जमिनी लाटणार्‍या व बँकाना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्‍या मोदीला ज्या बँकांनी कर्ज दिले, त्यांचे ऑडिट न करता डोळेझाक करणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरवर कारवाई करण्याची मागणी काळी आई मुक्ती संग्राम आंदोलनाच्या वतीने करण्यात आली. 

नुकतीच कर्जत तालुक्यातील खंडाळा गावातील ग्रामस्थांची बैठक घेऊन शेतकर्‍यांना जमिनी परत मिळण्यासाठी आंदोलनाचा निर्णय झाला होता. काल सकाळी स्थानिक शेतकरी व महिला येथे एकत्र आले. त्यांनी भारत माता की जय, नीरव मोदी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी पाटील यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला केला. 

मोदीने खंडाळा येथील सुमारे अडीचशे एकर जमीन गहाण ठेवून युनियन बँक ऑफ इंडियाकडून 52 कोटी रुपये कर्ज मिळवले. मात्र बँका जमीन गहाण ठेवून एक लाख रुपयाचे कर्ज देखील शेतकर्‍यांना द्यायला तयार नाही. पंजाब नॅशनल बँकेचे ऑडीट रिझर्व्ह बँकेने केले नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. बँकेने शहानिशा न करता मोदीला जमीन भावाच्या कितीतरी पटीने अधिक कर्ज दिले. रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका चोखपणे पार पाडली असती, तर हे प्रकरण घडले नसते. मात्र या प्रकरणाने रिझर्व्ह बँकेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी म्हटले.

Tags : Farmers movement , Karjat,naqgar news