Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांनी धरले अधिकार्‍यांना धारेवर

शेतकर्‍यांनी धरले अधिकार्‍यांना धारेवर

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:53PMकरंजी : वार्ताहर

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे काल (दि.15) कृषी विभागातर्फे बोंड आळी व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांवर प्रश्‍नांचा भडीमार केला. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी शेतकर्‍यांची दिलगिरी व्यक्त करत, यापुढे कृषी अधिकारी व शेतकर्‍यांत निश्‍चित संवाद ठेवला जाईल, असे आश्‍वासन दिले. 

करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरात कृषी विभागाच्यावतीने बीटी कपाशीवरील शेंदरी बोडअळीचे व्यवस्थापन, याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषितज्ज्ञ डॉ. बडदे यांनी बोंडअळी प्रादुर्भावाबाबत घ्यावयाची काळजी, या विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. खरेदी-विक्री संघाने अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय अकोलकर, माजी सरपंच सुनील साखरे, बाजार समितीचे संचालक अशोक अकोलकर यांनी करंजी येथील कृषी कार्यालयाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत, ज्या शेतकर्‍याने शेततलाव बांधलाच नाही, त्याचे सोडतीत नाव निघालेच कसे, असा सवाल उपस्थित केला. तसेच सर्वसामान्य शेतकर्‍यांना उल्लू बनायचे काम कृषी अधिकार्‍यांनी बंद करावे. कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेची माहिती कृषी वार्ता फलकावर लिहिली जात नाही, शेतकर्‍यांना कृषी सहायकाकडून सविस्तर माहिती दिली जात नाही, असे आरोप केले.

कृषी विभाग झोपेच सोंग घेऊन केवळ वेळ मारून नेण्याचे काम करत असून, कृषी विभागाला कार्यालयासाठी शासन भाडे देत नसेल, तर करंजी सेवा संस्था शेतकर्‍यांच्या हितासाठी कृषी कार्यालयासाठी फुकट जागा उपब्ल करूण देण्यास तयार आहे. वैयक्तीक लाभाच्या व इतर योजनांची माहिती कृषी कार्यालयात लावलीच पाहीजे, अशी मागणी अकोलकर यांनी केली. गटस्थापनेतून शेतकर्‍यांची निव्वळ फसवणूक केली जाते. तीन वर्षांत लाभार्थांची यादी जाहीरपणे कधी लावली का ? कृषी मार्गदर्शन एक फार्स असून, कृषी विभाग ठराविक लोकांनाच कृषी योजनांचा लाभ देण्याचे काम करत असल्याची टीका माजी सरपंच सुनील साखरे यांनी यावेळी केला. लवकरच नवीन जागेत कृषी कार्यालय स्थलांतरित करू, तसेच यापुढील काळात सर्व शेतकर्‍यांना बरोबर घेऊन काम करण्याची ग्वाही विभागीय कृषी अधिकारी बोराळे यांनी दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, मंडल अधिकारी बी. टी. सोनवणे यांच्यासह उपसरपंच शरदराव अकोलकर, माजी सरपंच शिवाजी भाकरे, महादेव अकोलकर, डॉ. अमोल आगासे, सुभाष अकोलकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.