Sun, Mar 24, 2019 04:54होमपेज › Ahamadnagar › अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले

शेतकर्‍यांची पिके केली अखेर उद्ध्वस्त

Published On: Aug 12 2018 1:00AM | Last Updated: Aug 11 2018 10:18PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगच्या शेतात अतिक्रमण केलेल्या शेतकर्‍यांची पिके महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी नेस्तनाबूत करण्यास सुरुवात केल्याने शेतकर्‍यांत खळबळ उडालेली दिसून येत आहे. 

शेती महामंडळाच्या टिळकनगर मळ्यामधील  गट नंबर 39 वरील अतिक्रमण शेती महामंडळाच्या अधिकार्‍यांनी काढल्याने शेकडो एकरांवर  शेती महामंडळाच्या जागेवर अतिक्रमण  केलेल्या शेतकर्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.  टिळकनगर स्टेट फार्मिंगच्या महामंडळच्या मालकीच्या गट नंबर 39 मध्ये शेतकर्‍यांनी 5 एकर क्षेत्र अतिक्रमण करून 4 एकर सोयाबीन व 1 एकर बाजरीचे पीक घेतले होते. दरम्यानच्या काळात शेती महामंडळाच्या अधिकार्‍यांनी या अतिक्रमण करणार्‍या शेतकर्‍याला वारंवार सूचना दिली. परंतु त्यास न जुमानता या शेतकर्‍यांनी अतिक्रमण केले. 

टिळकनगर मळ्याचे स्थावर व्यवस्थापक अशोक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाडी प्रमुख संजय तोरणे, तुकाराम टेकडे, अण्णा बबन हडनोर, दत्तात्रय मोहन थोरात, अशोक छबू  खैरनार, राजू यासिन शेख, मुन्ना पिंजारी, राजू बर्डे, कोंडीराम वाघ, अशोक शेळके, अंबादास घोडके, सुरेश हिवराळे, शिवाजी थोरात, भगवान फटांगरे आदींनी अतिक्रमण केलेल्या शेतात जाऊन शेतात असलेल्या सोयाबीन, बाजरी पिकाची आपल्या हाताने उपटून जमीनदोस्त केले. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव व टिळकनगर या दोन फार्म अंतर्गत जमिनी वाटपाची प्रक्रिया लाल फितीच्या आडमूठ धोरणामुळे रखडून पडलेली आहे. 

गेल्या 10 वर्षांपासून शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी बेचैन होऊन आत्महत्येचे दिशेने जात आहे. कुटुंब मोठे झाल्याने प्रपंच चालविणे अवघड झालेले आहे. सध्याच्या सरकारने कर्जमाफी केली. मात्र प्रत्यक्षात बहुतांश शेतकर्‍यांना  झालेली दिसून येत नाही. राज्यांतील भाजप - सेना आघाडी सरकारने साडेचार वर्षांच्या काळात खंडकरी शेतकरी जमीन मालकांची नेमकी काय परिस्थिती आहे, याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे खंडकरी शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीपासून वंचित असल्याने अतिक्रमण सारखे धोरण अवलंबित आहे.

आपल्या हक्काच्या जमिनीमध्ये जाऊन शेती करण्याचे धोरण खंडकरी शेतकर्‍यांनी पसंत केलेले दिसून येत आहे. खंडकरी शेतकर्‍यांच्या या धोरणाविरोधात शेती महामंडळाचे स्थानिक अधिकारी पोलिस प्रशासनाच्या सहाय्याने या शेतकर्‍यांचे पीक जमीनदोस्त करीत असल्याने या अतिक्रमण करणार्‍या शेतकर्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे.

महामंडळाच्या क्षेत्रात अतिक्रमण करू नये

टिळकनगर मळ्यातील शेकडो एकर जमीन ही काही शेतकर्‍यांनी बेकायदेशीर आपल्या ताब्यात घेऊन ती कसत आहे. लवकरच पोलिस प्रशासनाची मदत घेऊन झालेले अतिक्रमण जमीनदोस्त केले जाईल, तरी महामंडळाच्या क्षेत्रात कोणत्याही शेतकर्‍याने अतिक्रमण करू नये. केले असल्यास ते तात्काळ काढून घ्यावे अन्यथा कडक कारवाई केली जाईल.

स्थावर व्यवस्थापक, टिळकनगर मळा