Sun, May 31, 2020 07:02होमपेज › Ahamadnagar › नीरव मोदीच्या जमिनींवर शेतकर्‍यांनी घेतला ताबा

नीरव मोदीच्या जमिनींवर शेतकर्‍यांनी घेतला ताबा

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:45PMकर्जत :  गणेश जेवरे  

पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 300 कोटी रूपयांचा घोटाळा करणारा हिरे व्यावसायिक नीरव मोदी याची कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील जमीन स्थानिक शेतकर्‍यांनी बायका-मुलांसह जाऊन काल (दि.17) सकाळी ताब्यात घेतली. या जमिनीमध्ये नांगरट करून तेथे शेती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

ही जमीन ताब्यात घेण्यासाठी काळीआई मुक्ती संग्राम असे आंदोलन  करण्यात आले. काँग्रेसचे जेष्ठ नेते कैलास शेवाळे व तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याशिवाय नगर येथून आलेले सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. कारभारी गवळी व जलतज्ज्ञ मिलिंद बागल यांनीही शेतकर्‍यांच्या या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. यावेळी स्थानिक भूमिपुत्र असलेले संतोष माने, जयसिंग वाघमोडे, भाऊसाहेब वाघमोडे, हनुमंत पारखे, सत्यभामा माने, अनिल खांडेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

नीरव मोदी विदेशामध्ये पळून गेल्यानंतर सरकारने त्याच्या देशातील सर्व मालमत्तांवर टाच आणण्यास सुरुवात केलेली आहे. त्याची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील डोंगरावर मोदी याने सन 2011 मध्ये  स्वत:च्या व फायर स्टोन डायमंड प्रा. लि. मुंबई या कंपनीच्या नावावर 235 एकर जमीन घेतलेली आहे.  मोदी याने स्थानिक शेतकर्‍यांच्या या जमिनी अत्यंत कमी भावात लाटलेल्या आहेत. या जमिनी परत शेतकर्‍यांना मिळण्यासाठी काल सकाळी साडेअकरा वाजता येथे काळीआई मुक्ती संग्राम आंदोलन करण्यात आले. यावेळी गावातील शेतकर्‍यांसह महिला, तरूण हातामध्ये खोरे,टिकाव, बैलगाडी, ट्रॅक्टर, असे सर्व साहित्य घेऊन या जमिनीवर गोळा झाले. तेथे प्रथम काळ्या आईची पूजा करून बेलभंडारा उधळण्यात आला. डफाच्या गजरात काळी आई मुक्त झाल्याचा आनंद शेतकर्‍यांनी साजरा केला. नंतर बैल आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही जमीन नांगरण्यात आली. यावेळी भारत माता की जय,  जय जवान जय किसान, नीरव मोदी मुर्दाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिस किंवा महसूल प्रशासनाचे कोणीच प्रतिनिधी उपस्थित नव्हते.

यावेळी कैलास शेवाळे म्हणाले की, नीरव मोदी याने स्थानिक शेतकर्‍यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी 5 ते 15 हजार रूपये एकर, अशा कवडीमोल दराने खरेदी केल्या. अनेक शेतकर्‍यांना पूर्ण पैसेही दिले नाहीत. केवळ बँकांनाच नव्हे, तर गरीब शेतकर्‍यांना फसवून तो देश सोडून पळाला आहे. त्याला देशद्रोही जाहीर करून स्थानिक भूमिपुत्रांच्या शेतजमिनी सरकारने त्यांना परत मिळवून द्याव्यात. यावेळी किरण पाटील यांनी येथील सोलर प्रोजेक्टमधून स्थानिक शेतकर्‍यांना दरमहा 10 हजार रूपये मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली.

Tags : Farmer, control, Neerav, Modi, land,