Thu, Mar 21, 2019 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीच्या नुकसान भरपाईने शेतकरी समाधानी

बोंडअळीच्या नुकसान भरपाईने शेतकरी समाधानी

Published On: Jul 23 2018 1:06AM | Last Updated: Jul 22 2018 10:34PMपाथर्डी : राजेंद्र भंडारी

तालुक्यातील बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाल्याने शेतकर्‍यांत समाधान पसरले आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मराठवाड्यात झाल्याने सुरवातीला शासनाने फक्त मराठवाड्यातील शेतकर्‍यांनाच नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. मात्र,आ. राजळे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रत्यक्ष नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांना सुमारे तेरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित आहे.

मागील वर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीचे पिक घेतले होते. मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच शासनाने फक्त मराठवाड्यातील शेतकर्‍यांनाच नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. पाथर्डी व शेवगांव तालुके हे मराठवाड्या लगत असल्याने बोंडअळीने या तालुक्यातील शेतकर्‍यांचे नुकसान झाले असल्याची बाब आ. मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात झाली आहे.

पाथर्डी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड करतो. पिकाची फेरपालट होत नसल्याने शेतकर्‍यांचे उत्पादन घटून रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कृषी विभागाच्या वतीने यावर्षी तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांनी कपाशीच्या पिकांबाबत मोठी जागरुकता शेतकर्‍यांत निर्माण केली आहे. मागील वर्षाचा शेतकर्‍यांना चांगलाच झटका बसल्याने यावर्षी कपाशीची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकाची पेरणी झालेली नसली तर मागील आठवडयात काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाल्याने बाजरी, कपाशी, उडीत, हावरी, मका व कडवळ ही चारा पिके घेतली आहेत. 

तालुक्यात मागील वर्षीच्या समाधानकारक पावसाने पाणीपातळी बरी राहिल्याने तुरळक गांवे व वस्त्या वगळता कुठेही टंचाई जाणवली नाही. त्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादन यावर्षी वाढले आहे. मात्र, दुधाचे घसरलेले दर, घटलेली मागणी या कारणाने दूध व्यवसाय शेतकर्‍यांसाठी आतबट्ट्याचा झाला आहे.  आर्थीक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी बोंडअळीचे अनुदान मिळण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी समाधान आहे. 

137 गावातील शेतकर्‍यांसाठी तेरा कोटी रुपयांची मागणी शासनाकडे महसूल विभागाने केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात अकरा हजार शेतकर्‍यांसाठी सुमारे पाच कोटी 21 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होवून ते शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले आहे. शेतकर्‍यांचे बँक खाते नंबर महसलू विभागाने अपडेट ठेवल्याने विनाविलंब नुकसान भरपाई खात्यावर जमा करणे बँका व महसूल विभागाला सोयीचे ठरत आहे.