Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Ahamadnagar › शेतकरी आत्महत्या काही थांबेना!

शेतकरी आत्महत्या काही थांबेना!

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 10:36PMनगर : प्रतिनिधी

शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरु आहे. असे असताना देखील जिल्हाभरात शेतकरी आत्महत्या काही थांबताना दिसत नाहीत. गेल्या साडेचार महिन्यांत जिल्ह्यातील 38 शेतकर्‍यांनी गळफासाला जवळ केले आहे.

नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून शेतकरी आपली जीवनयात्रा संपवू लागला आहे. दुष्काळात शेती पिकत नाही. समाधानकारक पावसात शेती पिकली तर शेतमालाला भाव मिळत नाही.पिकांसाठी खर्च केलेला पैसा देखील हाताला लागत नसल्याने, शेतकरी वर्गाचे जगणे मुश्कील झाले आहे.

शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेवून शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला आहे. परंतु ही मदतच इतकी तोकडी आहे की, त्यातून शेतकर्‍यांना सावरले जाणे अवघड झाले आहे.यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील 38 शेतकर्‍यांनी गळफास जवळ केला. जानेवारी महिन्यात 12, फेब्रुवारी महिन्यात 9, मार्च महिन्यात 6, एप्रिल महिन्यात 9 तर मे महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसांत 2 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे. 

16 वर्षांत 643 आत्महत्या

2003 पासून आतापर्यंत जिल्ह्यातील 643 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2015 पासून आत्महत्येचा आकडा वाढत जावून, तो आता तीन अंकी झाला आहे.2015 मध्ये 118, 2016 मध्ये 144 तर गतवर्षी हा आकडा 140 वर गेला आहे. शासनाच्या नियमानुसार जिल्हा प्रशासनाने फक्‍त 342 शेतकर्‍यांच्या वारसांनाच मदतीस पात्र ठरविले आहे. प्रत्येकी फक्‍त एक लाखाची मदत देवून, शासनाने आपली जबाबदारी झठकली आहे.