कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात काल (दि.17) अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. पिकांबरोबर फळबागांचेही मोठे नुकसान झाले.
कर्जत तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला होता. वाढलेल्या तपमानामुळे नागरिक कासावीस झाले होते. सकाळी आठ वाजताच उन्हाचे चटके बसत होते. असह्य करणारा उकाडा आणि उन्हाची काहील यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
काल सकाळी पासूनच आकाशात ढग दिसत होते. दुपारी अचानक जोरदार वारा सुटला. धुळीचे लोट उडत होते. त्यापाठोपाठ तालुक्यातील अळसुंदे, कुंभेफळ, राशीनसह अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र पावसाबरोबर जोराचा वाराही सुटला होता. या वादळी पावसामुळे शेतकर्यांचे आंबा, डाळींब, चिकू, पोपई, लिंबू यासह विविध फळबांगाचे नुकसान झाले. त्याच प्रमाणे ऊस, कडवळ, मका ही पिके खाली पडली आहेत. ज्या शेतकर्यांचा कांदा, हरभरा किंवा इतर पिके रानात काढणी झालेली होती, ती भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक शेतकर्यांचा कडबा गंजी लावलेल्या नव्हत्या. त्या भिजल्याने त्याचे नुकसान झाले आहे. कर्जत शहरामध्ये मात्र हलका पाऊस पडला.
वीजेचे खांब कोसळले
कालपासून तालुक्यात जोरदार वारा सूटत आहे. या वार्यामुळे महावितरण कंपनीचे खांब अनेक ठिकाणी कोसळले. कर्जत शहरामध्येही जोरदार वार्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहक तारा तुटल्या. यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. एकतर असह्य उकाडा आणि त्यामध्ये वीज गायब झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत.
विजेचा खांब पडून शेतकर्याचा एक एकर ऊस जळाला
खेड : कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील बाळासाहेब नारायणराव मोरे यांच्या शेतातील एक एकर ऊस विजेच्या खांबातून निघालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला. ही घटना सोमवारी (दि. 16) झाली. खेड व गणेशवाडी भागात वादळी वार्यासह जोराचा पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्यामुळे मोरे यांच्या शेतात असणारा विजेचा खांब जमीनोदोस्त झाला. पावसात देखील वीज प्रवाह सुरू राहिल्याने विजेच्या तारा एकमेकांना चिकटून मोठा जाळ निर्माण झाला. त्यात मोरे यांचा एक एकर ऊस जळाला. या आगीत अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.
देवदैठणला शाळेचे पत्रे उडाले
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे अवकाळी पाऊस, वादळी वार्याचा मोठा फटका बसला. यामध्ये शाळेचे पत्रे उडाले तर ठिकठिकाणी झाडे व वीजेचे खांब पडले. सोमवारी (दि.25) सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक पावसाचे वातावरण झाले. सुसाट्याच्या वादळी वार्यासह पावसाची सुरुवात झाली. वाघमारे वस्ती (मेखणी) वरील जुनी इमारत असलेल्या जि.प. शाळेवरील सोळा पत्रे वार्याने उडून गेले. सर्व भिंतींना जागोजागी तडे गेले असून मागील भिंतही पडली. गावात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारी मोठमोठी झाडे मुळापासून जागीच उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतुकीस अडथळाही निर्माण झाला. गुंजाळ वस्तीवरील वीज पुरवठा करणारे तीन खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे शेती, पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने त्वरीत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे.
वादळी वार्याने मेखणी वस्तीवरील जि.प. शाळेचे पत्रे उडाले. सुट्टीचा काळ अन् सायंकाळची वेळ असल्याने जिवीतहानीचा धोका जरी टळला असला तरी इमारत जीर्ण झाल्याने शासनाने तात्पुरती तडजोड करत फक्त पत्रे व डागडुजी न करता शाळेसाठी नवीन इमारतच द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, ग्रा.पं. सदस्य अमोल वाघमारे यांनी केली.
चिचोंडी पाटील येथे गारांचा पाऊस
चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे काल संध्याकाळच्या वेळी जोरदार वार्यांसह गारांचा पाऊस पडला. अवकाळी पावसाने व जोरदार वार्याने कांदा, गहू, चिंच, फळबागांचे, शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वार्याच्या प्रचंड वेगामुळे पिके लोळली. आंब्याच्या कैर्या गळून पडल्या. शेतकर्यांनी पंचनाम्याची मागणी केली आहे.
Tags : ahamadnagar, ahamadnagar news, Karjat, rain, Farmer loss,