Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांच्या नजरा मुळा धरणाकडे

शेतकर्‍यांच्या नजरा मुळा धरणाकडे

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:52PMराहुरी : प्रतिनिधी

मुळा पाणलोटात पावसाचे उशिरा का होईना आगमन झाल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आता मुळा धरणाकडे लागल्या आहेत. दरम्यान, हरिश्‍चंद्र गडावर जोरदार पाऊस सुुरू झाल्याने आंबित धरण भरून काल पिंपळगाव खांड धरणही ओव्हर फ्लो झाल्याने यावर्षीही जुलैपूर्वीच मुळा धरणात पाण्याचा श्रीगणेशा होण्याची अपेक्षा आहे. 

दक्षिण नगर जिल्ह्यासाठी जलदायिनी समजल्या जाणार्‍या मुळा धरणाचा पाणीसाठा मृत साठ्यासमीप पोहोचला आहे. धरणात केवळ पिण्यापुरता पाणीसाठा शिल्लक असून तळाला गेलेला पाणी उपसा करताना पाणी योजनाही संकटात सापडू लागल्या आहेत. धरण लाभ क्षेत्रावर गेल्या 5 ते 6 दिवसांपासून आर्द्रा नक्षत्राची कृपा होत असताना पाणलोट क्षेत्रावर मात्र वरूणराजाने दडी मारलेली होती. गत दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर वरुणजाराची कृपा होत असताना कोतूळ, हरिश्‍चंद्रगड या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरीप सुरू झाली आहे. 

26 हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा 4700 दलघफू इतका झालेला आहे. 4500 दलघफू पाणीसाठा मृतसाठा असून धरणात केवळ 200 दलघफू इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. परिणामी, धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची धाकधूक वाढलेली असून धरणाकडे नविन पाणी जमा होण्याची अपेक्षा वाढलेली आहे. त्यातच धरणाने तळ गाठल्याने धरणावरील ग्रामिण भागातील 6 प्रादेशिक पाणी योजनांसह नगरपरिषदेच्या 2 योजना व महानगरपालिकेसह औद्योगिक वसाहतीच्या पाणी योजना संकटात आहे. दक्षिण नगर जिल्ह्याची भिस्त मुळा धरणावर अवलंबून असून  सर्वांच्या नजरा धरणाकडे खिळल्या आहेत. सुदैवाने मुळा पाणलोटात पावसाने हजेरी लावली आहे. आंबित धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर काल पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग 977 क्युसेकने मुळा धरणाच्या दिशेने झेपावला आहे.

गेल्यावर्षी 29 जुन रोजी मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली होती. यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह लाभधारकांच्या नजरा पावसाकडे आहेत.