होमपेज › Ahamadnagar › कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 19 2018 12:04AMवाळकी : वार्ताहर

कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शेतकर्‍याने आत्महत्या केली. नांदूर रस्त्यालगत असलेल्या गऊबाई बंगल्याजवळ चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी घडली.

दिलीप लक्ष्मण जगताप (वय 62) असे या शेतकर्‍याचे नाव आहे. हा शेतकरी चिचोंडी पाटील येथील रहिवाशी असून, त्याच्याकडे पतसंस्थेचे तसेच सेवा संस्थेचे कर्ज होते. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने दिवसेंदिवस जगताप यांच्यावर कर्जाचा बोजा वाढतच गेला. कजर्र्वसुलीसाठी त्यांच्यावर दबाब वाढत गेला. मात्र, उत्पन्नाअभावी कर्जाचा भरणा करणे शक्य होत नसल्याने त्यांचे नैराश्य वाढत गेले. या नैराश्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली, अशी गावात चर्चा होती.  

चिचोंडी पाटील येथील नांदूर रस्त्यालगत असलेल्या गऊबाई बंगल्याजवळ चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारनंतर ही घटना उघडकीस आली. जगताप यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले  असा परिवार आहे. उपसरपंच शरद पवार यांनी नगर तालुका पोलिस ठाण्याला दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.