Tue, Mar 19, 2019 05:10होमपेज › Ahamadnagar › कर्जास कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जास कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 03 2018 12:01AMवाळकी : वार्ताहर 

कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील तरुण शेतकर्‍याने मंगळवारी (दि.1) शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सेवा संस्थेचे 1 लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळाल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

रावसाहेब दशरथ कचरे (वय 38) असे या शेतकर्‍याचे नाव आहे. राळेगण म्हसोबा येथील धनगरवाडी येथे ते राहात होते. त्यांना 5 एकर शेती आहे. सेवा संस्था तसेच खासगी सावकाराचेही त्यांच्यावर कर्ज असल्याची गावात चर्चा आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नुकतीच अर्धा एकर शेतीही विकली होती. मात्र, त्यातून मिळालेल्या पैशातूनही हे कर्ज फिटले नाही. तसेच शेतीमध्ये उत्पादित केलेल्या मालास योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना नैराश्याने ग्रासले होते. या नैराश्यातून कचरे यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.