Thu, Apr 25, 2019 04:05होमपेज › Ahamadnagar › स्वच्छ सर्वेक्षणासाठी कागदपत्रांचा बनाव?

स्वच्छ सर्वेक्षणासाठी कागदपत्रांचा बनाव?

Published On: Feb 22 2018 1:26AM | Last Updated: Feb 22 2018 12:13AMनगर : प्रतिनिधी

घनकचरा विभागातील अनागोंदी, फोटोसेशन पुरतेच केलेले स्वच्छता अभियान, बंद पडलेला खतप्रकल्प आणि कागदावरच केल्या जाणार्‍या उपाययोजना यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर मनपाकडून सुरु असलेल्या तयारीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य कायम असतांना नागरिकांमध्ये जनजागृती केल्याबाबत पथकाला दाखविण्यासाठी फोटो, कागदपत्रांचा बनाव महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून केला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे राज्य संचालक डॉ. उदय टेकाळे आज (दि.22) शहरात येत असून सर्वेक्षणाच्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या पथकामार्फत शहरात 26 फेब्रुवारीला स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून या सर्वेक्षणाची तयारी महापालिकास्तरावर सुरु आहे. ‘घनकचरा’चा ढिसाळ कारभार, कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याने नगरविकास विभागाने सर्वेक्षणाच्या तयारीसाठी महापालिकेला चार अधिकारी, कर्मचारी पुरविले आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली सध्या तयारी सुरु आहे. शहर स्वच्छतेबाबत मनपाकडून कायमस्वरुपी उपाययोजना व्हाव्यात, असा स्वच्छता अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी वित्त आयोगामार्फत आजवर कोट्यवधींच्या निधीची महापालिकेकडून निव्वळ ‘उधळपट्टी’च झाल्याचे चित्र आहे. शहरात कायमस्वरुपी उपाययोजना करण्याऐवजी सर्वेक्षणात महापालिकेच्या अब्रूचे (वेशीवर टांगलेल्या) धिंडवडे निघू नयेत, यासाठीच सध्या प्रशासनाचा आटापिटा सुरु आहे. त्यातून शासनाच्या सर्वेक्षणाच्या उद्देशालाही हरताळ फासण्याचा प्रयत्न वस्तुस्थितीवरुन दिसून येत आहे.

स्वच्छतेबाबत जनजागृती न करताच काही नागरिक, कर्मचार्‍यांना उभे करुन हातात फलक दिले जात आहेत व त्याचे फोटो काढून पथकासमोर जनजागृती केल्याचा बनाव कागदत्रांद्वारे करण्यात येत असल्याचेही पुढे आले आहे. स्वच्छतेचे संदेश देणार्‍या भिंती रंगवून सोपस्कार पार पाडणार्‍या महापालिकेकडून या रस्त्यावरील कचराही उचलला जात नाही. उपनगर भागांत ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा परिसरातील सेप्टिक टँकमधील मैला उचलून तो कायम वर्दळ असलेल्या कुष्ठधाम रस्त्यावर, सीना नदीत सोडला जात आहे. सर्वेक्षणाच्या तोंडावर कराव्या लागणार्‍या स्वच्छता विषयक उपाययोजना केवळ कागदावरच असून दर आठवड्याला राबविण्यात आलेले स्वच्छता अभियानही केवळ फोटोसेशन पुरतेच असल्याचे स्पष्ट होत आहे.

विभाग प्रमुखांच्या उदीसनेमुळे लिटबिन्स खरेदी, गल्ली बोळांमधील कचरा संकलनासाठीच्या ढकल गाड्यांची खरेदी रखडली आहे. संपूर्ण शहरातील कचरा संकलन खासगीतत्वावर करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदाही जाणीवपूर्वक लटकविण्यात आल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या बुरुडगाव येथील खतनिर्मिती प्रकल्पाला मागील महिन्यातच मानांकन मिळाले होते. तेथे निर्माण होणार्‍या खताचे हरित कंपोस्ट महासिटी ब्रँडींगही शासनाकडून करण्यात आले. मात्र, त्यानंतर अवघ्या 8 दिवसांतच हा प्रकल्प संगनमतातून बंद पाडण्यात आला. खतनिर्मिती प्रकल्प चालविणार्‍या संस्थेच्या निविदेची मुदत संपुष्टात आली असून अद्याप नवीन निविदाही मनपाकडून काढण्यात आलेली नाही. सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर जुन्या संस्थेला मुदतवाढ देण्याची गरज असतांना तीही देण्यात आलेली नाही. दुसरीकडे शासनाचे दिलेले स्वच्छता अ‍ॅपचे टार्गेट अद्यापही पूर्ण झालेले नाही. अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींचीही मनपाकडून दखल घेतली जात नाही. खुद्द महापौर, पदाधिकारी, आयुक्‍त यासाठी रस्त्यावर उतरले. मात्र, अद्यापही टार्गेट अपूर्णच आहे. वारंवार आवाहन करुनही नगरसेवकांकडून यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने शहर स्वच्छतेबाबत नगरसेवकांनाही गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता सर्वेक्षण प्रतिष्ठेचे केलेले असतांना, नगरविकास विभागाकडून दररोज पाठपुरावा सुरु असतांना आणि सर्वेक्षणाच्या तयारीसाठी आयुक्‍त, काही अधिकारी स्वतः धावपळ करत असतांना घनकचरा विभाग मात्र सर्वेक्षण गांभीर्याने घेत नसल्याचेच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक डॉ. टेकाळे आज नगरमध्ये येत असून त्यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मनपाकडून करण्यात आलेल्या (कागदावर!) उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी त्यांनी केली तर महापालिकेकडून सर्वेक्षणात दाखविण्यासाठी केला जाणारा बनाव समोर येण्याची शक्यता आहे.