Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Ahamadnagar › फडणवीस-विखे मैत्री राजकारणा पलिकडचीच

फडणवीस-विखे मैत्री राजकारणा पलिकडचीच

Published On: Dec 21 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 11:07PM

बुकमार्क करा

राज्याच्या राजकारणात प्रश्‍नांची जाण असलेले बडेनेते म्हणून स्व. बाळासाहेब विखे पाटील व स्व. शंकरराव चव्हाण यांची ओळख होती. प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी स्व. विखे यांचे सर्व पक्षांत स्नेहाचे संबंध होते. ही विखे घराण्याची परंपरा ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे चालवित आहेत. त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोणीत आले. त्यांचे जाहीर अभिनंदन करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी फडणवीस-विखे मैत्री राजकारणा पलिकडचीच असल्याबद्दल जाहीरपणे ‘मोहर’ लावली. त्यामुळे त्यांच्या ‘मैत्री’ बद्दल शंका घेणार्‍यांवर एकप्रकारे ‘प्रहार’ झाला आहे.
लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रवरानगर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण काय वक्तव्य करतात? याकडे राजकीय निरीक्षकांच्या नजरा लागल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मैत्रीबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. ना. विखे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा खमंगपणे होत होती. त्यामुळे कालचा कार्यक्रम आदरांजली सभेचा असला तरी जिल्हावासियांच्या भुवया उंचावल्या होत्या.

सन 2014 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कोणत्याही प्रश्‍नाच्या सोडवणुकीत सलोख्याचे संबंध आहे. ना. विखे हे आघाडी सरकारमध्ये प्रदीर्घकाळ मंत्री राहिले असल्याने प्रश्‍न धसास लावणे हा त्यांचा स्वभाव बनला होता. दरम्यान, सुरवातीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी युती सरकारला काही काळ काम करून द्यावे. त्यानंतर विरोधी भूमिका ठरविण्याची रणनीती आखण्यात आली होती. त्यामुळे प्रारंभी विरोधी पक्षनेता म्हणून ना. विखे यांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली नाही. तसेच राज्यातील सहकाराचे बडे प्रस्थ म्हणून त्यांचा लौकिक असल्याने प्रश्‍नांसाठी रस्त्यावरची लढाई त्यांच्यासाठी नवखीच होती.

दरम्यान, प्रथम पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार वितरण सोहळा, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन, केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत शिर्डी शहर वाढीव पाणीपुरवठा योजनाच्या कामाचा भूमिपूजन समारंभानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांचे राहाता तालुक्यात येणे झाले. त्या-त्या वेळी कार्यक्रमापेक्षा फडणवीस-विखे मैत्रीबद्दल अधिक चर्चा झाली. शिर्डी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ना. राधाकृष्ण विखे  यांना आमच्या पक्षात जादा मित्र असतील. मात्र, त्यांच्या स्वत:च्या पक्षात हितशत्रू देखील कमी नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्या मैत्रीबद्दल राज्यभर रान उठविले गेले. विखे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याचे ना. विखे यांनी स्पष्टपणे खंडण करताना ‘पाणी’ हाच आमचा धर्म व पक्ष असल्याचे निक्षून सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा लोणीत येत असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.

प्रारंभी ना. विखे यांनी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य झिजविले. राहाता तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे, पश्‍चिम वाहिनीचे पाणी तुटीच्या गोदावरी खोर्‍यात आणणे यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. 

पाण्याच्या बाबतीत आमची उपेक्षा झाली असल्याने पाणी हाच आमचा धर्म, पाणी हाच आमचा पक्ष आहे. त्यासाठी सर्वांचे आशिर्वाद ठेवावे, असे भावनीक आवाहन केले.या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रमाणेच ना. राधाकृष्ण विखे यांचे सर्व पक्षात चांगले संबंध आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोणीत आले. त्यांचे मी जाहीर अभिनंदन करतो हे वाक्य बरेच काही सांगून गेले आहे.