नगर : प्रतिनिधी
शेतकर्यांच्या मालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन भाजपाने केंद्रात सत्ता मिळवली. आता पुन्हा ते हेच आश्वासन देत आहेत. एकदा विश्वासघात झाला. आता पुन्हा पाच वर्षे थांबायचे का? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारने दुसर्या संधीची वाट पाहू नये. आम्हाला आश्वासने नको, केलेल्या मागणीला कायद्याचे स्वरुप आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करत एफआरपी व दुधाच्या प्रश्नासंदर्भात उद्या (दि.29) पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होेते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, हेमराज वडगुले, रवींद्र मोरे, सुनील लोंढे आदी उपस्थित होते.
..तरच शिवसेनेशी मैत्री शक्य!
स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या-ज्या वेळेस शेतकर्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेते, त्या-त्या वेळेस शिवसेनेने आम्हाला समर्थनही दिलेले आहे. मात्र, सेना सध्या सत्तेत आहे. आम्हाला भाजपशी संबंधित सत्ताधारी कोणीही नको आहे. भाजपला सत्तेचा माज येवू लागला आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यावरच त्यांची आमच्याशी नैसर्गिक मैत्री होऊ शकते, असे आपण म्हणालो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.