Wed, May 22, 2019 20:16होमपेज › Ahamadnagar › वाळू तस्करांच्या घरात स्फोटके

वाळू तस्करांच्या घरात स्फोटके

Published On: May 05 2018 12:47AM | Last Updated: May 04 2018 11:51PMराहुरी : प्रतिनिधी

तालुक्यातील बारागाव नांदूर येथे तडीपार करण्यात आलेल्या वाळू तस्कर माळी बंधूंच्या अटकेसाठी पोलिस प्रशासनाने किशोर माळी याच्या घराची झाडाझडती घेतली असता, घरामध्ये स्फोटक दारूगोळा सदृश पदार्थ आढळून आले.

बारागाव नांदूर येथील सुभाष साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी, गौतम साहेबराव माळी या तिघा भावांवर साधारण 25 ते 30 वाळू तस्करीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पुढाकार घेतला होता. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तिघांनाही जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश जारी केले.

पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असताना पसार झालेल्या माळी बंधूंना पकडण्यासाठी श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक वाघचौरे व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे पथक राहुरी भागात तैनात असून दोघांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने सामूहिकरित्या किशोर माळीच्या घरावर छापा टाकला. यावेळी बारागाव नांदूर येथील तरुणांसह टाकलेल्या छाप्यात पोलिसांना त्याच्या घरात दारू सद‍ृश स्फोटक पदार्थ सापडले आहेत. 

फास आवळणार 

बारागाव नांदूर भागात पोलिस प्रशासन माळी बंधूंना पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक केली जाणार असून किशोर माळी याच्या घरात सापडलेल्या पदार्थाची तपासणी केली जाणार आहे. ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.