Thu, Jul 18, 2019 04:20होमपेज › Ahamadnagar › गळीताअभावी ऊस शिल्लक राहण्याची शेतकर्‍यांमध्ये चिंता

बाहेरील कारखान्यांकडून पिळवणूक

Published On: May 21 2018 1:08AM | Last Updated: May 20 2018 11:42PMसोनई : वार्ताहर

गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहण्याची ऊसउत्पादक शेतकर्‍यांमध्ये भीती आहे. त्याचा गैरफायदा घेऊन बाहेरचे सहकारी व खासगी कारखाने काटा व दर कपात करीत आहेत. त्यामुळे यास कंटाळलेल्या शेतकर्‍यांमध्ये ’गड्या आपला तालुक्यातलाच कारखाना भला,’ अशा आशयाची चर्चा नेवासा तालुक्यात झडू लागली आहे.     

जिल्ह्याच्या बहुतांश भागात ’उदंड झाला ऊस’ अशी परिस्थिती आहे.जिल्ह्यातील सहकारी, तसेच खाजगी कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. अशोक, ज्ञानेश्वर, मुळा कारखान्यांच्या गळीत हंगामाची या महिनाखेरीस सांगता होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस गळीताअभावी शिल्लक राहण्याचा धोका दिसू लागला आहे. याच चिंतेने ग्रासलेल्या ऊसउत्पादक शेतकर्‍यांच्या असहायतेचा जिल्ह्यातील काही सहकारी तसेच खाजगी कारखानदारांनी मोठा गैरफायदा घेऊन शोषण चालविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गळीत हंगामाच्या सुरुवातीला उसाला 2 हजार 500 की 2 हजार 300 रुपये दर द्यायचा, हा वाद केंव्हाच मागे पडून, अगोदर आमच्या पिकाची विल्हेवाट लावा, यासाठी शेतकरी कारखानदारांकडे चकरा मारत आहेत. एरवी आमच्याकडे तुमच्या उसाची नोंद द्या, म्हणून पायघड्या घालणारे तालुक्याबाहेरील काही चाणाक्ष खाजगी कारखानदारांनी ऊसउत्पादक शेतकर्‍यांची नेमकी हिच अगतिकता ओळखून त्यांना नियोजनबद्धरित्या नागविण्याचा धडाका लावल्याचे दिसून आले. 

तोडणी अभावी हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी या खाजगी कारखान्यांच्या यंत्रणांशी संपर्क साधला असता, उसाला दर काय देणार, हा प्रश्न शेतकर्‍यांनी विचारण्याऐवजी ’उसाला तुम्ही दर काय घेणार’ असा प्रतिप्रश्न शेतकर्‍यांनाच विचारला जाऊ लागला. सुरुवातीला 2 हजार 100 नंतर 2 हजार, नंतर 1 हजार 800 आणि शेवट 1 हजार 700 रुपयांनी ऊस गाळपास नेण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या कितीतरी मिन्नतवार्‍या कराव्या लागल्या. शेतकर्‍यांच्या या असहायतेचा गैरफायदा घेऊन बाहेरील कारखान्यांनी प्रचंड प्रमाणावर तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे नेलेल्या ऊसाच्या दरातच नाही तर वजनातही शेतकर्‍यांना नागवून यंदाच्या गळीत हंगामात केवळ खाजगीच नव्हे तर काही सहकारी कारखान्यांनीही अत्यंत निर्विकारपणे आणि फक्त व्यवहाराशीच आपली बांधिलकी ठेवून हात धुवून घेतल्याचे आता तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकरी उघडपणे बोलू लागले आहेत.     

हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना या कारखान्यांकडून तब्बल 200 ते 500 रुपये दर कमी ठरवून घेतला जात होता. एवढेच नव्हे तर उसाच्या वजन स्लीपही वेळेवर दिल्या जात नव्हत्या. एरवी शेतकर्‍यांच्या नावाने गळा काढणारे, स्वतःचे डोके फोडून घेणारे लोकप्रतिनिधी तालुक्यातील शेतकरी राजरोसपणे नागवले जात असताना मात्र मूग गिळून गप्प का राहिले, याचे गूढ उकलण्याच्या प्रयत्नांत शेतकरी असल्याचे बोलले जात आहे.

‘मुळा’ कडून व्यवहार आणि शेतकरी हिताचा मेळ

गळीत हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सहकारी व खाजगी कारखान्यांकडून ऊस दर जाहीर करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. केवळ मुळा कारखान्याने आधीच व्यवहाराच्या कसोटीवर घासून, शेतकर्‍यांचे हित लक्षात ठेवून 2 हजार 300 रुपयांचा दर जाहीरच केला नाही, तर त्यावर ठामही राहिले. त्यावेळी इतर कारखान्यांनी थेट 2 हजार 550 रुपये दर जाहीर केला. त्यामुळे त्यावेळी ’मुळा’चा दर कमी दिसून काही काळ त्यावरुन चांगलेच वादंग माजले होते. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनीही त्यांचे शेतकर्‍यांप्रती असलेले पुतनामावशीचे प्रेम उफाळून आणत ऊस दराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ’मुळा’चे व्यवस्थापन शब्दाला जागल्याचे दिसून आले.